आपल्या पिंप्रीखुर्द ता चाळीसगाव या मूळ गावी वडिलोपार्जित १७ गुंठे शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागणार नाही, हे लक्षात घेता नाना पाटील यांनी बारावीनंतर व्यावसायिक शिक्षणाची वाट धरली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेशन’ दुरुस्तीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर नाशिक शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. शहरातील उपनगर व लहान काॅलनीतून प्रशिक्षणातील व्यवसाय सुरू केला. रात्र दिवस कष्टाची तयारी ठेवत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवून मेहनतीतून कमविलेले दोन पैसे शिल्लक टाकले. दरम्यान, विविध क्षेत्रातील प्रयोगशील शेतकरी यांचे शेतात केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग पाहून आपनही प्रयोगशील शेतकरी व्हावे, ही इच्छा मनात बाळगून त्यांनी पत्नी गायत्री हिच्याजवळ बोलून दाखवली. शिल्लक पैशातून मोटरसायकल, कार व अन्य वस्तू खरेदी न करता गावी थोडीफार शेती खरेदी केल्यास फायद्याचे होईल, म्हणून याविषयी दोघांचे एकमत झाले. त्यानुसार २०१०मध्ये २ एकर शेती विकत घेतली.
दोघांचे विचार पुन्हा शेतीला हातभार
रासायनिक खते व पाण्याच्या अतिवापरामुळे क्षारपड झालेली ती शेती गावातील शेतकऱ्यांनी त्यातील उत्पादनाविषयी चिंता व्यक्त केली. मात्र पाटील दाम्पत्याने निराश न होता शेती सुपीक करण्याची जिद्द ठेवली माती व पाणी परीक्षण करून सुरूवातीपासूनच रासायनिक खतांचा वापर नियंत्रित केला. सेंद्रिय खतांचा वापर करून, पालापाचोळा शेतातच कुजविला. ठिंबक संच बसवून दुसऱ्याच्या विहिरीवरून पाणी घेऊन कपाशीचे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतले. कमी खर्चात उत्पादनात वाढ शक्य झाल्याने पाटील दांम्पत्याने पुन्हा २०१२मध्ये अडीच एकर शेती विकत घेतली. आपल्या यशातील वाटा लक्षात घेऊन नाना पाटील यांनी ही अडीच एकर शेती पत्नी गायत्रीच्या नावाने केली.
शेतकऱ्याना केले एकत्र
पिंप्रीखुर्द या गावातील २० शेतकऱ्यांना एकत्र घेऊन ‘आत्मा’अंतर्गत २०१३ साली ‘अन्नदाता’ शेती सेवा मंच या नावाने शेतकरी गट स्थापन केला. कृषी प्रदर्शने, मार्गदर्शनपर मेळावे, तसेच शेती शाळांमध्ये वेळोवेळी सहभागी होऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतीविषयक अद्ययावत तंत्रज्ञान घरबसल्या प्राप्त करण्यासाठी त्यांनी आपल्या शेतकरी गटाच्या नावाने व्हाॅट्सॲपवर स्वतंत्र खाते सुरू केले. यात जिल्हा कृषी अधीक्षकांसह राज्यभरातील बरेच प्रयोगशील शेतकरी यांचा समावेश आहे.
सुधारित तंत्रज्ञानाचा वापर
कपाशीची लागवड करताना चार बाय दीड फुटाचा वापर केल्यास झाडांची संख्या वाढून हवा व सूर्यप्रकाश पिकाला चांगले मिळते. कम्पोस्ट खत, वनस्पती जन्य कीडनाशके व आंतरपिक म्हणून ठिकठिकाणी मका, मूग, उडिद, तीळ यांचा वापर केल्यास मित्र किडींची संख्या वाढून शत्रू किडींचा नायनाट केला जातो. रसशोषक किडींचे सर्वेक्षण करण्यासाठी चिकट पिवळे सापळे, कामगंध सापळे याचा वापर केल्यास कपाशीवरील मावा, तुडतुडे, फुलकिडे यांना आवर घालण्यात मोठी मदत होते.
अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर व अनुभवी प्रयोगशील शेतकरी यांच्याकडून मार्गदर्शन घेतल्यास त्याचा निश्चितच शेती खर्च कमी व उत्पन्न जास्त येण्यासाठी मदत होईल. भरमसाठ रासायनिक खते व महागडी कीटकनाशके यांचा वापर कमी होऊन खर्चात बचत होईल. तसेच सेंद्रिय पध्दतीने शेती केल्यास कुटुंबांचे व जमिनीचे आरोग्यदेखील चांगले राहील, असे नाना पाटील यांच्या शेतीवर प्रत्यक्ष भेट दिल्यावर त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.