कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथे पोळा सण आगळ्या वेगळ्या चालीरीतीने साजरा करण्यात येतो. यात जुन्या गावातील बाजारपट्टा व बसस्थानक भागातील सावता माळी चौक या दोन्ही ठिकाणी बोली बोलून पोळा फोडण्यात येतो. आज जुन्या गावातील पोळा बंटी महाजन यांनी नऊ हजार रुपये बोलीवर घेत पहिला मान मिळविला, तर दुसरा मान ग्रामपंचायत सदस्य अनिल महाजन यांनी दोन हजार शंभर रुपये बोली बोलून मिळविला, तर सावता माळी चौकातील पोळा मोहन फकिरा महाजन यांनी तीन हजार पाचशे रुपये बोली बोलून पोळा फोडण्याचा मान मिळविला. याप्रसंगी बोली बोलून पोळा फोडण्याचा मान मिळविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा येथे अत्यंत उत्साहात पार पाडली जाते. बसस्थानक परिसरातील शेतकरी आपल्या सर्जाराजाला सजवून सावता माळी चौकात आणतात, तर जुन्या गावातील शेतकरी बाजारपट्ट्यात आपल्या सर्जाराजाला आणतात. या ठिकाणी सर्व शेतकºयांचे बैल एकत्रित जमल्यानंतर बोली लावली जाते. बोलीमध्ये जो शेतकरी जास्त बोली बोलेल त्याला पोळा फोडण्याचा मान दिला जातो. याप्रमाणे पोळा फोडणाºया सर्जाराजाला सर्वात पुढे वाजत गाजत मानाने पुढे जाऊ देण्यात येते. यानंतर इतर बैलांना सोडण्यात येते. याप्रमाणे पोळा साजरा करण्यात येतो.बोलीतून आलेल्या पैशांतून जुने गावातील विविध मंदिराची देखभाल दुरुस्ती, सुधारणा करण्यात येते, तर सावता माळी चौकातील बोलीमधून हनुमान मंदिराची देखभाल सजावट केली जाते.या आगळ्या वेगळ्या पोळ्याची चर्चा परिसरात असल्याने बोली बोलून फुटणारा पोळा पाहण्यासाठी कजगावसह परिसरातील असंख्य शौकीन या ठिकाणी जमा होतात. याप्रसंगी फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
सर्वाधिक बोली बोलणाराला मिळाला पोळा फोडण्याचा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 10:05 PM