लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी १ हजारपेक्षा अधिक १०९३ नवे कोरोना बाधित आढळून आले आहे. गेल्या पाच महिन्यांतील कोरोना रुग्णसख्येचा हा उच्चांक असून १२ बाधितांच्या मृत्यूची एकाच दिवसात नोंद करण्यात आली आहे. गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये सहा रुग्ण हे ६० वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. गेल्या दोन दिवसात २३ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी जळगाव शहरात तीन बाधितांचा मृत्यू झाला तर २५६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह चोपड्यात १००, चाळीसगावात ९५, अमळनेरात ७६ बाधित समोर आले आहेत. सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात रुग्ण समोर आले आहेत. चोपड्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही १४७९ वर पोहोचली आहे.
नोडल अधिकार्यांची नियुक्ती
कोरोनाच्या रुग्णांना तत्काळ उपचार उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी उपजिल्हाधिकारी किरण सावंत व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
वाॅर रूम व बेड मॅनेजमेंट कमिटी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वॉर रूम, खाटा प्रवेश व्यवस्थापन समिती, मृत्यू समन्वय समिती नेमण्यात आली आहे. त्याचे कामकाज मंगळवारी २३ मार्च रोजी सुरु झाले आहे. दि.२४ मार्च ते १५ एप्रिल या दरम्यान १६ अधिकार्यांची याठिकाणी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.