- कुंदन पाटील
सर्वाधिक तापमानाची नोंद; ३९ अंश सेल्सिअसवर गेला पारा : तीन दिवस चटक्यांचेजळगाव : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान सोमवारी ‘आयएमडी’ने नोंदविले आहे. ३९ अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा गेला असून आणखी दोन दिवस चटके सहन करावे लागणार आहेत.त्यानंतर तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.
एप्रिल महिन्यातही यंदा अवकाळी पावसासह वादळ आणि ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसवर गेला होता. त्यानंतर घसरलेला पारा पस्तीशीच्या घरातच राहिला. रविवारी मात्र तापमानाच अचानक वाढ झाली. ३९ अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा गेल्याने दिवसा उन्हाचेही चटके असह्य होत गेले. पुढच्या दोन दिवसात तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंश सेल्सिअसवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ऊन-सावलीचा खेळ
एकीकडे तापमानाचा पारा उंचावला असताना दिवसा मात्र ऊन-सावलीचा खेळ सुरुच होता. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत गेला. दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान मात्र रस्त्यावरची वाहतूकही तापमानामुळे ओसरल्याचे दिसून आले.
पुन्हा पाऊस!
दि.१३ एप्रिलपासून दोन दिवस तापमानाचा पारा पुन्हा घसरणार असून दिवसा ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तविली आहे. १० व ११ एप्रिल रोजी सकाळी व संध्याकाळी काहीसे ढगाळ वातावरण राहणार असले तरी पावसाचा मात्र अंदाज नाही. मात्र, १३ एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर आठवड्याच्या शेवटी १३ व १४ एप्रिल रोजी ढगांच्या गर्दीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज ह वर्तवला आहे.