भुसावळ : चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने जळगाव- नागपूर महामार्ग धोकादायक बनला असून अपघाताचे प्रमाण खूपच वाढले आहे. या मार्गावरुन वाहनधकारकांना वाहन चालविताना अक्षरश: कसरत करावी लागते. जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. या रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे, अशी अपेक्षा यामुळे व्यक्त होत आहे.दोघे झाले जखमीगुरुवारी सायंकाळी देखील साकेगाव जवळ या महामार्गावर एक अपघात झाला. यात दोघे मोटरसायकलस्वार जखमी झाले. देवीदास लटकन कोळी (५८) रा. साकेगाव हे दुचाकीवरून जात असताना गोदावरी कृषी महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी शिवम अनिल चौधरी (२२) रा.विटवे ता.रावेर हा पाठीमागून येत होता. त्याच वेळेस महामार्गावर ट्रक क्रमांक (एम. एच. १९- ए. ए. ७४२९ हा महामार्गावर थांबला होता. या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्यासाठी निघाले असता त्याच वेळेस कालीपिली ने प्रवासी उतरण्यासाठी रस्त्यावरच ब्रेक मारून दरवाजा उघडला असता मागील दोन्ही दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटले व जोराची धडक झाली, यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. साकेगावचे कोळी यांना भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात तर विटवेचा विद्यार्थी यास गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातामुळे या ठिकाणची वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.नेहमीच वाहतुकीचा खोळंबासध्या रस्ता अरुंद झाल्याने किरकोळ अपघात झाल्यास अथवा वाहनांची गर्दी यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होत असतो. यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतुकीचा खोळंबा झाल्यास वेळही वाया जातो. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
महामार्ग झाला बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 5:48 PM