आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १८ - औरंगाबाद ते जळगाव या दरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणासाठी सपाटीकरणाच्या कामाला वेग आला आहे. संपूर्ण कॉँक्रिटीकरण असलेल्या या रस्त्याचे काम जर्मन बनावटीच्या मशीनरीच्या साहाय्याने होणार असल्याने निविदाधारकांकडून मशीनरीच्या खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.जळगाव ते औरंगाबाद या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण असल्याने राष्टÑीय महामार्ग विभागाने या मार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण केले होते. त्यात दिवसाला दहा हजार वाहने या मार्गावरून ये-जा करीत असल्याचा अहवाल दिला होता. त्यातच हा मार्ग म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध आहे. अजिंठा लेणी याच मार्गावर असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची वर्दळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात असते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सिल्लोड येथे दोन महिन्यांपूर्वी आले होते. त्यांनी या विषयाची माहिती घेऊन उपलब्ध जागेतूनच चौपदरीकरण करण्यात यावे, असा आदेश केला होता. त्यानुसार ऋत्विक इन्फ्रास्ट्रक्चर हैद्राबाद या मक्तेदारास कामाबाबत आदेशही देण्यात आले आहेत. त्यानुसार औरंगाबादकडून या रस्त्याच्या कामाला मक्तेदाराने सुरुवातदेखील केली आहे. रस्त्याचे सपाटीकरण तसेच मुरूम टाकणे, त्यावर रोलर फिरविण्याचे काम वेगात सुरू आहे. मात्र या मार्गावरील वाहनांची रहदारी आणि रोज होणारे अपघात लक्षात घेता रस्त्याचे चौपदरीकरण अजिंठा चौफुलीपासून तातडीने सुरू केल्यास वाहतुकीची कोंडी कमी होईल, अशी मागणी जळगावकरांची होती. त्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहमती दर्शविली होती. त्यानुसार डिसेंबर महिन्यात झालेल्या ‘डीपीडीसी’च्या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. मात्र अद्यापही अजिंठा चौकापासून काम सुरू झालेले नाही. या महामार्गाची दैना झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारीही अपघात झाला, त्यात एक तरुण ठार झाला.जळगाव ते औरंगाबाद या रस्त्याचे कॉँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी मक्तेदाराकडून जर्मन बनावटीच्या मशीनची खरेदी करण्यात येत आहे. या मशीन कमी वेळेत अधिक काम करीत असतात. रस्त्यावर काँॅक्रिटीकरण करीत असताना त्यासाठी आवश्यक असलेले सपाटीकरण, भराव, रस्त्याची दबाई या गोष्टी रस्ते बांधणीच्या निकषानुसार करणे गरजेचे असते. अन्यथा हा रस्ता खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे काँॅक्रिटीकरणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळी कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जर्मन मशीनद्वारे होणार जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:36 PM
सपाटीकरण व मुरूम टाकण्याचे काम वेगात
ठळक मुद्देनिविदाधारकांकडून मशीनरीच्या खरेदीची प्रक्रिया सुरूएकाच वेळी कामाला सुरुवात