जळगाव : प्रेमाला नव्हे प्रेमाच्या नावावर चालणाऱ्या अश्लील कृत्यांना आमचा विरोध आहे, असे म्हणत हिंदू राष्ट्रसेनेने व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात मोटारसायकल रॅली काढत विविध ठिकाणी भेटी दिल्या. यात एका ठिकाणी एक अल्पवयीन मुलगी आढळली. यातील तिला एमआयडीसी पोलिसांकडे नेऊन तिच्या पालकांनाही बोलविण्यात आले.
१४ फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सुरुवातीला टॉवर चौकात श्रद्धांजली वाहून दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यात हिंदू राष्ट्रसेनेच्या कार्यकर्त्यांनी काही कॅफेंना भेटी दिल्या, मात्र त्या ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे कॅफेवाल्यांनी त्यांना सांगितले. एका ठिकाणी काही जोडपी दिसल्यानंतर त्यांना विचारणा केली, त्यांच्या पालकांशीही संपर्क साधला यानंतर ही जोडपी घरी गेली. टॉवर चौकापासून शिवतीर्थ मैदानापासून कोल्हे हिल्स परिसर, लांडोरखोरी परिसर, मेहरूण तलाव परिसर आदी ठिकाणीही भेटी देऊन त्यांनी पाहणी केली.
विविध कार्यक्रम
सकाळी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यासह हिंदू राष्ट्रसेनेने सायंकाळी सावखेडा वृद्धाश्रमात जाऊन मातृ-पितृ पूजन केले.