फैजपूर, ता. यावल : फैजपूरच्या ऐतिहासिक भूमीवर देशविरोधी कृषी कायद्यांचे दहन करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, मोदी सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी रणसिंग फुंकले.
ब्रिटिश राजवटीला उलटून लावण्याचे कार्य ज्या ऐतिहासिक भूमीतून झाले त्या फैजपूर ग्रामीण काँग्रेसच्या अधिवेशन स्थळी बुधवारी देशविरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांचे दहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजित मेळाव्याला त्यांनी संबोधताना आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मांडत आलो पण आता खऱ्या अर्थाने लढाई आता आहे या ऐतिहासिक भूमीतून प्रेरणा घेऊन आता निघणार आहे ज्या भूमीत ब्रिटिश जुलमी व्यवस्थेच्या विरोधात शेतकरी हिताचा मसुदा पंडित नेहरू महात्मा गांधी यांनी तयार केला त्या भूमीला नतमस्तक होत इंग्रज सरकारबद्दल जी चीड होती ती चिड मोदी सरकारबद्दल आहे या सरकारला सत्तेतून दूर करण्याची आग या भूमीतून घेऊन जाणार असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला
येथील धनाजी नाना महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आले होते.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा प्रभारी तथा आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रीय समन्वयक शाम पांडे, माजी खासदार डॉ उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार रमेश चौधरी यांच्या उपस्थितीत ही होळी करण्यात आली.
काँग्रेस आत्मा आहे- प्रणिती शिंदे
मनोगतात जिल्हा प्रभारी आमदार प्रणिती शिंदे यांनी कितीही मोदी अथवा फडणवीस येऊ दे काँग्रेसला कोणी हात लावू शकत नाही कारण काँग्रेस आत्मा आहे व आत्मा नेहमी अमर असतो असे सांगत उपस्थितांमध्ये नवचैतन्य भरले.
प्रास्ताविकात आमदार शिरीष चौधरी यांनी १९३६ पासून काँग्रेसचे पाळेमुळे रुजलेला हा मतदारसंघ आहे महात्मा गांधी यांच्या आदेशाने घराघरात काँग्रेस केली आहे बाळासाहेब मधुकरराव चौधरी, जे.टी. महाजन यांच्या दूरदृष्टीमुळे या परिसरात विकासाचा पाया रचला गेला आहे याचा उल्लेख करून जिल्हा पुन्हा काँग्रेसमय करण्याचा निश्चय त्यांनी केला. राजीव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात चौधरी यांनी फैजपूर काँग्रेसचा इतिहास सांगत आठवणी जागविल्या. सूत्रसंचालन जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी केले. व्यासपीठावर यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, प्रदेश प्रतिनिधी प्रमोद मोरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, प्रदेश सचिव अश्विनी बोरसे, रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, प्रदीप पवार यांची उपस्थिती होती.