आमडदे, ता. भडगाव : येथील सुमारे ३०० वर्षांपूर्वीची ऐतिहासिक गढी यंदाच्या अति पावसामुळे कोसळली आहे. अनेक पिढ्या या वास्तूच्या साक्षीदार होत्या.आमडदे येथील संभाजी आनंदा भोसले व त्यांची भावंडे मागील ४ वर्षांपर्र्यत या वास्तूत वास्तव्यास होते मात्र दिवसेंदिवस ही वास्तू धोकादायक व राहण्यायोग्य नसल्याने ते इतरत्र राहण्यास गेले. गढीने आजतागायत ६ पिढ्या अनुभवल्या आहेत. संभाजी आनंदा भोसले वय ८० वर्षे (हयात) तसेच त्यांचे वडील आनंदा मखा भोसले, आजोबा मखा तोताराम भोसले, पणजोबा तोताराम कौतिक भोसले, खापर पणजोबा कौतिक रावजी भोसले अश्या पिढ्या आजपर्यंत या गढीने अनुभवलेल्या आहेत.गढीचे वैशिष्ट्यसुमारे ३०० वर्षांपूर्वी कौतिक रावजी भोसले यांनी या गढीचे बांधकाम केलेले आहे. पूर्वी पेंढारी लोकं खूप त्रास द्यायचे. चोऱ्या, दरोडा, खून करायचे. ही बाब लक्षात घेता कौतिक रावजींनी संरक्षणासाठी गढीची उभारणी केली होती. गढीची १०० फूट रुंदी व १०० फूट लांबी असून २५ फूट उंची आहे. भिंतीची रुंदी ७ फूट होती. त्यावर बैलगाडे चालायचे एवढी रुंदी भिंतीची होती. गढीत ७ घरे १०० फूट लांबीची व मुख्य दरवाजा २० फूट रुंद व २५ फूट लांबीचा होता. लहान मोठे ८ दरवाजे व ८ खिडक्या होत्या. तळमजला ४० फूट लांबीचा व त्यात गुप्त रस्ता होता. तळमजल्याचा दरवाजा हा १५ फूट लांब व १० फूट रुंद असा महाकाय होता. पेंढारी लोक ज्यावेळेस आक्रमक करायचे, त्यावेळेस गावातील लोकं व कुटुंबातील सदस्य या तळमजल्याचा आश्रय घेत असत. त्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण गढीचे बांधकाम फक्त मातीत झालेले आहे. नंतरच्या कालावधित या वास्तुत शेकडो चिमण्यांची घरे होती, चिमण्यांचा किलबिलाटही आता गावकऱ्यांना ऐकू येणार नाही. या वास्तूची शासन दरबारी किंवा परिवाराकडे कुठलीही कागदपत्रे नाहीत. मात्र ती कागदपत्रे मोडी लिपीत होती असे सांगण्यात येते.
ऐतिहासिक गढी झाली जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:25 PM