लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात पोलीस दलावर सर्वाधिक ताण आहे. अशात, या ताणाकडे दुर्लक्ष करत मिळालेल्या वेळेत पोलीस आपले छंद जोपासताना दिसत आहेत. यात कुठे संगीतातून सकारात्मक सूर मिळत आहेत, तर कुणाला लॉकडाऊनमध्ये सामाजिक कार्य करून ऊर्जा मिळत असल्याचे दिसत आहे. पोलीस दलातील अशाच खाकीतील ‘कलाकारां’चा घेतलेला हा आढावा.
दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला. हा रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या. त्यात पोलिसांनासुध्दा कोरोनासंदर्भात लागू करण्यात आलेल्या आदेशांची अंमलबजावणी, नाकाबंदी, वाहन तपासणी, बंदोबस्त, त्यात कोविड रुग्णालय सुरक्षाव्यवस्था, चाचणीसाठी आलेल्या किंवा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची नोंदणी, रुग्णाचा मृत्यू झाल्यास पंचनाम्यापासून अंत्यविधीपर्यंतची जबाबदारी तसेच विविध बंदोबस्ताची जबाबदारी खांद्यावर आहे. त्यात गुन्ह्यांची उकल करण्यासाठी त्यांची धडपड सुरूच असते. परिणामी, पोलिसांचा थेट जनतेशी संपर्क होत आहे. अशात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा फटका पोलीस दलालाही बसत आहे. काही पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण, न घाबरता पोलीस त्यांचे कर्तव्य बजावत आहेत.
अशात त्यांच्यातील अनेक जण स्वतःच्या कलेतून, छंद जोपासून ताण कमी करताना दिसत आहेत.
संगीतातून मिळतो सकारात्मक सूर
संघपाल तायडे सध्या पोलीस मुख्यालयात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना संगीताची फार आवड. ‘सकाळी ६ वाजता जाग आल्यानंतर एक ते दीड तास रियाज करतो. तसेच १२ तास सेवा बजावल्यानंतर घरी आल्यानंतर मिळालेल्या मोकळ्या वेळेत गायनाचा सराव करतो. सोबत लिखाणही करतो. काही मिनिटांसाठी तरी त्या गायनातून कोरोनाच्या वातावरणात स्वतःबरोबर नागरिकांवरचा ताण कमी व्हावा, हीच धडपड असते’ असे ते सांगतात. अनेक 'शो'मध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे. ‘वेगवेगळे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करतो. मोकळ्या वेळेत गाणेदेखील ऐकतो, त्यामुळे काही प्रमाणात ताण कमी होण्यास मदत मिळते’, असेही ते सांगतात. कोरोनाच्या काळात त्यांनी गीतेदेखील लिहिली आहेत.
सामाजिक कार्यातून मिळते ऊर्जा
लहानपणापासून लिखाणाची तसेच मदत करण्याची आवड असलेले अमित शांताराम माळी हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस बिनतारी संदेश विभागात कार्यरत आहे. कृती फाऊंडेशनच्या माध्यमातून अमित व त्यांच्या पत्नी डॉ. श्रध्दा माळी यांनी गुजरात व महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत सुमारे दीडशे मोफत आरोग्य शिबिर घेत आगळा वेगळा छंद जोपासला आहे. व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, मधुमेह मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करीत ते विद्यार्थ्यांसह नागरिकांना मार्गदर्शन करतात. ह्या कार्यशाळा व शिबिरे सुटीच्या दिवशी आयोजित करीत असल्याचे माळी यांनी सांगितले. यातून आनंद व सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचेही ते सांगतात. तर शाळांमध्ये शिष्यवृत्तीदेखील देतात व थॅलेसिमियाग्रस्त मुलांना त्यांनी दत्तक घेतले असल्याचे सांगितले.
फिटनेस आवश्यक आहे...
सकाळी ६ वाजता उठायचे. डाएट झाल्यानंतर दोन तास जिममध्ये व्यायाम करायचा. नंतर कर्तव्यावर हजर व्हायचे. राष्ट्रीय, राज्यस्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी तयारी करायची. सायंकाळी पुन्हा दोन तास व्यायाम करायचा... पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेले रवी वंजारी यांचा हा दिनक्रम ठरलेला. अशात, धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये त्यांचा फिटनेसवर भर असतो. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि प्रामाणिकपणे सेवा ही त्यांची त्रिसूत्री ठरलेलीच. आंतराष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे सरावासाठी पोलीस दलाकडून सहकार्य मिळत आहे. आतापर्यंत मिस्टर वर्ल्ड, मिस्टर एशिया, मिस्टर इंडिया, महाराष्ट्र श्री याच्यासह सलग तीन वर्ष उत्तर महाराष्ट्र श्री चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताबदेखील पटकाविला असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवसभर असते, शरीरात ऊर्जा...
पिंप्राळा येथील रहिवासी कमलेश भगवान पाटील हे सन २०१४ मध्ये पोलीस दलात रुजू झाले. सध्या ते शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. आठवीपासून स्विमिंगची आवड, दररोज सकाळी ५.३० वाजता उठून मैदानावर धावण्याचा सराव झाल्यानंतर एक ते दीड तास स्विमिंगचा सराव करतात. कर्तव्य बजावल्यानंतर सायंकाळी पुन्हा स्विमिंग. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्यामुळे स्विमिंग टँक बंद आहेत, म्हणून सायकलिंग करीत असल्याचे ते सांगतात. सलग सहा वर्षं जिल्हास्तरावर स्विमिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. नांदेड व विशाखापट्टणम येथे राष्ट्रीय स्पर्धेतसुध्दा सहभाग नोंदविल्याचे त्यांनी सांगितले. स्विमिंगमुळे दिवसभर शरीरात ूर्जा असते. सकारात्मक येऊन ताण कमी होतो व कामाचा आनंद मिळतो, असेही ते सांगतात.