लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : थर्टी फर्स्टचे ‘डर्टी फर्स’ होऊ नये यासाठी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात तब्बल ९३ अधिकारी आणि ६२७ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहेत. तर ५७८ होमगार्डही त्यांच्या दिमतीला आहेत. पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी याबाबतचे आदेश पारीत केले आहेत.
रात्री ११ नंतर कोणताही कार्यक्रम सुरू राहणार नाही. तसेच मद्यप्राशन करून रस्त्यावर फिरणार नाही , याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ड्रंक ॲण्ड ड्राइव्हसाठी एकूण ३५ पथके नियुक्त केली आहेत. त्यात २३ अधिकारी, ८९ पोलीस कर्मचारी आणि ९० होमगार्ड यांचा समावेश करण्यात आला आहे.
मिरवणुका न काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात नाकाबंदीसाठी ५८ पॉईंट ठरवण्यात आले आहेत. त्यात ३४ अधिकारी २४९ पोलीस कर्मचारी आणि १८० होमगार्डचा समावेश करण्यात आला आहे, तर नेहमीचे १२६ ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे. याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली.