लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पावसाळ्यामध्ये करण्यात येणाऱ्या कामासाठी लागणारे साहित्य विक्री व दुरुस्ती करणारे दुकाने, तसेच बांधकाम साहित्याचे निगडित दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत यांनी काढले आहे.
पावसाळ्यामध्ये करण्यात येणाऱ्या कामासाठी लागणारे साहित्य विक्री व दुरुस्ती करणारे दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ करण्यात आलेला आहे. सकाळी ७ ते सकाळी ११ या अत्यावश्यक सेवांच्या दुकानांच्या वेळेत ही दुकाने सुरू राहणार आहेत.
या सेवांना परवानगी
छत्री दुरुस्ती करणारी दुकाने, प्लास्टीक शीट, ताडपत्री, रेनकोट इत्यादी वस्तू विक्री व दुरुस्ती करणारी दुकाने, तसेच घटक सुरू राहतील. यासोबतच १५ ते २० मे या कालावधीत चक्रीवादळामुळे, तसेच आगामी येणाऱ्या मान्सून कालावधीत घर, इतर बांधकाम यांची दुरुस्ती, सुरक्षितता, यासाठी करावयाच्या उपाययोजनेसाठी आवश्यक साहित्य विक्री करणारे दुकाने व घटक सुरू राहतील.
नियमांचे उल्लंघन केल्यास १० हजार दंड
या आस्थापनांच्या ठिकाणी काम करणारे सर्व ४५ वर्षांवरील कर्मचारी, कामगार यांचे लसीकरण करून घेणे बंधनकारक राहणार आहे. या बाबींशी निगडित असणाऱ्या सर्व व्यक्तींना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहणार असून, नियमांचे उल्लघंन करणारे दुकान मालक, चालक व घटक यांचेकडून १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल व पुन्हा चूक केल्याचे आढळून आल्यास, संसर्ग कमी होईपर्यंत सदरचे दुकाने बंद ठेवण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
या सूचनांचे पालन होत आहे किंवा नाही, याची जबाबदारी संयुक्तरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहणार असून, सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास शिक्षेस पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी आदेशात म्हटले आहे.