जळगाव : मास्टर कॉलनीत जावेद नबी काकर यांच्याकडे घरफोडी करणाऱ्या वसीम कबीर पटेल (रा.मास्टर काॅलनी) या संशयितास एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून घरातून चोरलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
पटेल याने ५ डिसेंबर रोजी रात्री जावेद नबी काकर यांच्या घराच्या खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला होता. ८ हजार रुपये रोख व पाच मोबाईल असा ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा केल्यानंतर पटेल हा सुरत व मालेगाव येथे राहत होता. तो जळगाव येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यावर उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद,सुधीर साळवे व योगेश बारी यांनी त्याला ताब्यात घेतले. दुपारी न्यायालयात हजर केले असता न्या.सुवर्णा कुलकर्णी यांनी त्याला २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले.