अमळनेर, जि. जळगाव : सोमवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ अमळनेर शहरातील सर्व सिंधी व इतर व्यापाऱ्यांनी बंद पुकारून काळ््या फिती लावून मूक मोर्चा काढला. यावेळी व्यापाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करीत बेमुदत बंदचा इशारा दिला. दरम्यान, शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे. पोलिसांनी तत्काळ लक्ष न दिल्यास याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार करू, असा इशाराही अनिल भाईदास पाटील यांनी दिला.नर्मदा वाडी जवळ बसंतराय तेजुमल बितराई व अजय यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलने गोळीबार केला होता. सुदैवाने गोळी भिंतीला लागली. त्यामुळे अनर्थ टळला शहरात सामान्य नागरिक व व्यापाºयांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आह. त्यामुळे व्यापाºयांनी मंगळवार, ४ रोजी बंद पुकारून मोठ्या बाजार पेठेतून मुकमोर्चा काढला. राणी लक्ष्मीबाई चौकातून सुभाष चौक मार्गे गंगाघाट बाजारपेठ, भागवत रोड, बसस्थानक मार्गे मोर्चा प्रांत कचेरीवर आला. यावेळी व्यापारी तथा माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा न बसल्यास बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा दिला तर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र पिंगळे यांनी घटनेचा निषेध व्यक्त करीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष घालण्यासाठी साकडे घालू असे सांगितले. शहरातील सीसीटीव्हीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून या बंदला फोटोग्राफर संघटना आणि मेडिकल दुकानदारांनी पाठिंबा दिला.मोर्चाचे नेतृत्व लालचंद सैनानी, भरत ललवाणी, शंकर बितराई, प्रकाश शहा, चेलाराम सैनानी, बिपीन कोठारी, महेश कोठावदे, राजेश कोठावदे, दिलीप सैनानी, राकेश माहेश्वरी, हरि भिका वाणी, पंकज मराठे, विनोद कोठारी, फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पाटील, अनिल कोराणी, पुरुषोत्तम शेट्ये, विलास चौधरी, श्रीराम चौधरी, राकेश ललवाणी यांच्यासह सुमारे ३०० व्यापारी सहभागी झाले होते.तक्रार करूनही पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्षमी निवडून आल्यानंतर लगेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र तरीही वाढत्या शस्त्र गुन्ह्यांचे प्रकार वाढीस लागले आहेत. यामुळे आपण केलेल्या तक्रारीप्रमाणे वॉश आऊट सारखी कोणतीही मोहीम राबवली गेली नाही असे दिसते, अशी प्रतिक्रिया आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केली. वारंवार व्यापारी गुन्हेगारांकडून लक्ष केले जात असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात तब्बल १५०च्या वर गावठी कट्टे आहेत. याबाबत पोलीस दलाकडून कोणतीही मोहिम राबविण्यात आलेली नाही. छोटे मोठे गुन्हेगार सर्रास गावात फिरतात. त्यांचे कोंबिंग आॅपरेशन राबविण्यात येत नाही, ही बाब शहराच्या दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट असून याबाबत पोलिसांनी दखल घेऊन कारवाई न केल्यास याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार करू, असा इशाराही अनिल भाईदास पाटील यांनी दिला.
पोलिसांविरुद्ध आमदारच करणार गृहमंत्र्यांकडे तक्रार, अमळनेर येथे गोळीबाराच्या निषेधार्थ बंद व मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:30 PM