सुनील पाटील
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात पोलीस आयुक्त पदावरून हटविल्यानंतर परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप आणि त्यानंतर तपासी यंत्रणेला मिळून आलेले काही पुरावे खास करून ‘ती’ डायरी. यामुळे महाराष्ट्रातील पोलीस दल हादरले असून त्याचे पडसाद जळगाव पोलीस दलातही उमटले आहेत. ज्या दिवशी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला, त्याच दिवशी जिल्ह्यातील संपूर्ण अवैध धंदे बंद ठेवण्याचे फर्मान निघाले. त्यानंतर हे धंदेही बंदही झाले. येत्या काही दिवसात पोलीस दलात मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. आपल्याला कोणीच हरवू शकणार नाही अशी वल्गना करणारे राज्यातील अनेक अधिकारी आता हादरलेले आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर हे देखील निवृत्तीच्या वाटेवर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडूनही काही सूचना वजा आदेश जिल्हा पोलीस दलाला मिळालेले आहे. त्याची अंमलबजावणी युद्धपातळीवर केली जात असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय नवीन महानिरीक्षकांबाबतही आतापासूनच फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा नाशिक परिक्षेत्रातील पोलीस दलात सुरू आहे. सचिन वाझे प्रकरण मुंबईत घडले असले तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पोलीस दलावर झालेला आहे. जिल्हा पोलीस दलात बदलून आलेले अधिकारी नवीनच आहेत. कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातून बदलून गेलेले आहेत, त्यामुळे अंतर्गत बदल्या होण्याची शक्यता कमीच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बदल्यांना स्थगिती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे प्रशासकीय बदल्यांची शक्यता नाही. बदल झालाच तर महासंचालक किंवा गृह खात्यातूनच होईल, असेही पोलीस दलात बोलले जात आहे.