कोरोनाचा फटका : जिल्ह्यात ३२४ होमगार्ड बेरोजगार
जळगाव : कोरोनाने अनेक क्षेत्रातील लोकांचा रोजगार अर्थात रोजीरोटी हिरावलेली आहे. याच काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून कर्तव्य बजावणारे होमगार्ड्स यांचीदेखील सरकारने रोजीरोटी हिरावून घेतलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० पेक्षा जास्त वय असलेल्या होमगार्ड्सची सेवा सध्या घेतली जात नाही. तत्कालीन महासमादेशक संजय पांडे यांनी हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात ३२४ होमगार्डची रोजीरोटी आजच थांबलेली आहे. कोरोनाच्या संकटातच त्यांच्यावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. जळगाव जिल्ह्यात २०४५ होमगार्ड आस्थापनेवर आहेत. त्यात १८४२ पुरुष तर २०३ महिलांचा समावेश आहे. ५० व त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांमध्ये २९० पुरुष तर ३४ महिला होमगार्ड आहेत. सध्या या होमगार्डला कोणतेही काम मिळत नाही. त्यामुळे काम नाही तर दाम नाही, दामच नाही तर घरात खायला आणायचे कुठून? असा प्रश्न या होमगार्डसमोर निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील नोंदणीकृत होमगार्ड्स -२०४५
महिला होमगार्ड्स -२०३
५० पेक्षा जास्त वय असलेले -
सध्या सेवेत असलेले - ३२४
७० टक्के लसीकरण
जिल्ह्याच्या आस्थापनेवर असलेल्या २०४५ पैकी १३२४ होमगार्ड्सचे लसीकरणास झाले असून १०६२ पहिला डोस घेतला आहे तर २६५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
आम्ही जगायचे कसे?
प्रतिक्रिया...१
५०पेक्षा जास्त वय असल्याचे कारण सांगून होमागार्ड्सला कामावर घेतले जात नाही. पोलिसांच्या बरोबरीने काम करत असताना त्यांना हा नियम लागू नाही, मग आम्हालाच का?. घरखर्च व मुलांचे शिक्षण कसं करायचं याची आम्हाला चिंता आहे.
- उषा दत्तू पाटील, महिला होमगार्ड
प्रतिक्रिया २
दीड वर्षापासून आम्ही घरी आहोत. त्यामुळे मन विचलित झाले आहे. रोजीरोटीच थांबल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाइलाजाने मुलांना मामांकडे शिक्षणासाठी पाठवावे लागले आहे.
- हिरालाल भोई, होमगार्ड
प्रतिक्रिया ३
तत्कालीन महासमादेशक संजय पांडे यांनी ५० पेक्षा जास्त वय असलेल्या होमगार्डला कामावर न घेण्याचे आदेश जारी केलेला आहे. त्यामुळे दीड वर्षापासून अनेकांचा रोजगार बुडाला आहे. शासनाच्या इतर सर्व विभागांची आदेश मागे घेण्यात आले, मात्र होमगार्डबाबत निर्णय घेण्यात आला नाही. आमच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
- अरुण नेरकर, तालुका समादेशक
कोट..
५० व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे, त्यामुळे या वयातील होमगार्डना तूर्तास कामावर न घेण्याचे महासमादेशकांचे आदेश आहेत. जळगाव जिल्ह्याच्या आस्थापनावर ३२४ होमगार्ड आहेत. शासनाचे जे आदेश येथील त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
- चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक, होमगार्ड