जळगाव : एकीकडे माणसाची प्रगती होत असताना दुसरीकडे माणसाचा दुसरा पाय मात्र अंधश्रद्धेत बुडाल्याचे चित्र पहायला अजूनही आहे. याच अंधश्रद्धेपायी एका महिलेच्या नशिबात मृत्यूनंतरही वनवास आला. जळालेल्या महिलेचा मृतदेह घरी आणला तर आमचे घर कोणी भाड्याने घेणार नाही या कारणावरुन घरमालकाने या महिलेचा मृतदेह घरी आणू देण्यास नकार दिला, त्यामुळे जिल्हा रुग्णालयापासूनच या महिलेची अंत्ययात्रा काढण्याची वेळ हतबल नातेवाईकांवर गुरुवारी सकाळी आली.एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक ५० वर्षीय महिला १५ मार्च रोजी जळाली होती. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी दुपारी ४ वाजता या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या मृत्यूची माहिती नातेवाईकांना कळविण्यात आली. शवविच्छेदनानंतर राहत्या घरुनच अंत्यसंस्कार काढण्याचे निश्चित झाले, मात्र महिला रहात असलेल्या घरमालकाने मृतदेह घरी आणण्यास नकार दिला. त्यामुळे नातेवाईकांसमोर मोठे संकट उभे राहिले.आमचे घर कुणी भाड्याने घेणार नाहीजळालेल्या महिलेचा मृतदेह घरी आणला व तेथून अंत्ययात्रा काढली तर गल्ली व परिसरात त्याची चर्चा होईल. घरात जळून महिलेचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे आमचे घर कोणीच भाड्याने घेणार नाही असे कारण मालकाने महिलेच्या नातेवाईकांना सांगितले. या अंधश्रध्देचा नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अर्थात गुरुवारी जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहापासूनच अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी सर्व नातेवाईक जिल्हा रुग्णालयात जमले. परंपरेनुसार विधी करण्यात आला व तेथून अंत्ययात्रा काढण्यात आली.प्रगत देश अन् अंधश्रध्दाभारताने विविध क्षेत्रात प्रगतीचे पाऊल टाकले असून जगात स्वत:चे असे अस्तित्व निर्माण केले आहे. तर दुसरीकडे याच प्रगत देशात अजून अंधश्रध्दा कायम असल्याचे या घटनांवरुन सिध्द होत आहे. एकीकडे अमावस्येच्या दिवशी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा केला जातो तर दुसरीकडे घरात महिला जळाली म्हणून तिचा मृतदेह देखील घरी आणू दिला.
मृतदेह घरी आणण्यास घरमालकाने दिला नकार, शवविच्छेदनगृहापासूनच निघाली जळीत महिलेची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:55 PM