चोपडा : बहुरूपी ही भारतात प्राचीन काळापासून चालत आलेल्या लोककलांपैकी एक कला आहे. मनोरंजनासोबतच आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळख व स्मरण करणे तसेच समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठविण्याचे काम हे बहुरूपी कलावंत करत असतात.मुळचे जयपूर येथील आकाशराज बहुरूपीया हे दरवर्षी चोपडा येथे येतात. बहुरूपी हे त्यांचे पारंपरिक काम असून गेल्या अनेक पिढ्यांपासून चोपड्यात सुरू आहे. सध्या गेल्या १० दिवसांपासून शहरात आपली कला सादर करीत आहेत. विविध पौराणिक पात्रे तसेच चित्रपटांमधील गाजलेली पात्रे ते कलात्मकरीत्या सादर करतात.मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे जयपूर येथील बहुरूपी कलावंत आकाशराज बहुरूपी यांचा स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशनमार्फत सत्कार केला. भाई कोतवाल रोड वरील श्री संत सेना महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय धनगर, तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा फाऊंडेशनचे मार्गदर्शक श्रीकांत नेवे उपस्थित होते.याप्रसंगी स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र शिंपी, धुळे येथील कृषी अधिकारी उमाकांत पाटील, तसेच सदस्य राधेश्याम पाटील, किशोर मराठे, राजेंद्र सोनार, चेतन देशमुख, मुकेश मराठे, साहिल सोनार उपस्थित होते. दिनेश साळुंखे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
बहुरूपी लोककलावंतांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:13 PM