लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाने हाहाकार माजविल्यामुळे बेरोजगारी निर्माण झाली आहे. शिक्षण व्यवस्थाही कोलमडली. ऑनलाईन शिक्षण सुरूचं आहे. पण, काही अनुदानित शाळा भरल्याच नाहीत. त्या शाळेतील शिक्षकांना पगार नाही. परिणामी, शिक्षक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. दरम्यान, ज्या हातात खडू घेवून विद्यार्थ्यांना शिकवलं जात होतं. त्याच हातात आज खुंरप घेवून शेतात काम करण्याची वेळ या शिक्षकांवर आली आहे.
मागील वर्षी कोरोनाने थैमान घातले आणि अनेकांचे आर्थिक नुकसान केले. अनेकांच्या नोक-या सुध्दा घालवल्या. त्यातच विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांवर उपासमारीची वेळा सुध्दा आली. काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा कहर कमी झाला अन् जनजीवन सुरळीत झाले. पण, जाने महिन्यापासून पुन्हा कोरोनाने हात पसरवल्यामुळे शाळा बंद पडल्या. महत्वाचेचं विषय शिकवू लागल्यामुळे इतर शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आली. काहींची नोकरी सुध्दा गेली. दुसरीकडे पालकांनी देखील शुल्क न भरल्यामुळे संस्था चालकांवर देखील शिक्षकांना पगार कसा करणार? हे संकट उभे राहिले.
मिळेल ते काम करायला सुरूवात
विनाअनुदानित विद्यालयातील अनेक वकील, अभियंता, डॉक्टर्स घडविले. तेही तुटपुंज्या वेतनावर. आधीच शाळेला शासकीय अनुदान नाही. त्यात कोरोना संकटात शिक्षकांना पगार नाही. असे किती दिवस भूक मारून घरी बसायचे. त्यामुळे या शाळांमधील काही शिक्षकांनी मिळेल ते काम करायला सुरूवात केली आहे. कुणी कंपनीत जाण्यास सुरूवात केली आहे तर कुणी मेडिकल स्टोअरवर काम करून आपल्या संसारचा गाडा हाकत आहे. काहींनी तर आपले मुळं गाव गाठून शेतीला सुरूवात केली आहे.
कंपनी सुध्दा बंद आहे, हाताला काम नाही...
विनाअनुदानित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होतो. मात्र, कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. तुटपुंजे पगार मिळत आहे. त्यामुळे कंपनीत कामाला आपण जात होतो. सध्या कठोर निर्बंधामुळे कंपनी काही दिवस बंद आहे. त्यामुळे हाताला काम नाही. आर्थिक घडी विस्कटल्यामुळे आता पत्नी सुध्दा एका ठिकाणी कामाला जावून संसाराचा गाडा हाकण्यासाठी मदत करीत असल्याची प्रतिक्रिया एका शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. दुसरीकडे कला शिक्षकांवर सुध्दा उपासमारीची वेळ आली आहे. चित्रकला विषयाला ऑनलाईन शिक्षणात स्थान नसल्यामुळे अनेक शाळांनी त्या शिक्षकांचे वेतन बंद केले आहे. त्यामुळे हे शिक्षक सुध्दा आर्थिक अडचणीत सापडले आहे.