जळगाव : गेल्या पाच वर्षातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु आहे. हे गुन्हेगार आता कुठे आहेत? याची माहिती घेवून त्यांच्यावर एमपीडीए व मोक्कका तसेच प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल. गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण होण्याच्या दृष्टीने कामकाज केले जाणार असून याप्रकरणी संपूर्ण परिणाम मिळेपर्यंत कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरिक्षक डॉ़ बी.जी. शेखर यांनी शुक्रवारी जळगावातील पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या गोळीबारांच्या घटनांची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे यापुढे जास्तीत जास्त अग्निशस्त्रे अर्थात गावठी पिस्तुल जप्त करण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबविली जाणार आहे. अवैध शस्त्रांविरोधातील कारवाईचे परिणाम लवकरच दृश्य स्वरुपात दिसतील असे देखील त्यांनी सांगीतले. त्यासोबतच अवैध शस्त्रांची तस्कर रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून त्यामुळे आता शस्त्र वापरणा-या गुन्हेगारांची खैर नाही, असेही त्यांनी डॉ. शेखर यांनी सांगितले. त्याचबरोबर जिल्ह्यात होणाऱ्या अनुचित घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर हा ७ ते ८ कोटींचा प्रस्ताव डीपीडीसीला सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली. पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा आदी उपस्थित होते.