जळगाव : शहरात प्रत्येक रस्ते व गल्ल्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डा आहे की ख•यात रस्ता हेच कळत नाही. या खड्डयांमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले जात आहे. नागरिकांची ओरड व राजकीय पक्षांचे आंदोलनानंतर जागे झालेल्या महापालिकेने खड्डे दुरुस्तीसाठी निविदा मागविल्या,त्याही निम्मा पावसाळा संपल्यानंतर! मनपाचा हा प्रकार म्हणजे वरातीमागून घोडे असाच आहे.दरम्यान, या खड्डयांच्या प्रश्नावर महापौर भारती सोनवणे यांनी मंगळवारी बांधकाम विभागाची बैठक बोलावली. स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा, आयुक्त सतीश कुलकर्णी, गटनेते भगत बालाणी, नवनाथ दारकुंडे, अॅड.दिलीप पोकळे, चेतन सनकत, सुरेश सोनवणे, शहर अभियंता डी.एस.खडके आदी उपस्थित होते. शहरात अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या कामामुळे अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. नव्याने रस्ते तयार करण्यास अडचण असली तरी रस्त्यांची डागडुजी करण्यास काहीही अडचण नाही, त्यामुळे तात्काळ प्रक्रिया राबवावी अशा सूचना महापौर सोनवणे यांनी दिल्या.निविदा प्रक्रिया सुरुसर्व खड्डे खडी, मुरुम टाकून बुजविणे आवश्यक असून त्यादृष्टीने शॉर्ट टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आठ दिवसात प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षात कामाला १२ दिवसांनी सुरुवात होणार असल्याची माहिती शहर अभियंता डी.एस.खडके यांनी दिली. अनेक ठिकाणी काम बाकी असल्याने रस्त्यांचे काम देखील करता येणार नाही. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पक्ष व विविध संघटना विविध प्रकारचे आंदोलने करीत आहेत. निम्मा पावसाळा संपण्यात आल्यावर मनपाने निविदा काढणे व खड्डे दुरुस्तीचा निर्णय घेतला. पावसाळा सुरु होण्याआधीच ही कामे होणे अपेक्षित होते.रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत एकत्र येण्याचे आवाहनबळीराम पेठेतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होत आहेत. या विरोधात आवाज उठविण्यासाठी नागरिकांनी २३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता बळीराम पेठेतील साई मंदिराजवळे एकत्र येण्याचे आवहन स्फूर्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी भोगे-पाटील यांनी केले आहे.
मनपाचे वरातीमागून घोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 12:16 PM