जळगाव : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक २२ रोजी सायंकाळी जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. मात्र शासनाकडून पंचनामे पूर्ण होऊन मदतीच्या रक्कमेचा पहिला हप्ताही प्राप्त होऊन गेल्याने शेतकऱ्यांनी नुकसान झालेले पीक उपटून टाकून रब्बीची पेरणीही करून टाकली आहे. त्यामुळे आता केंद्रीय पथकाला कोणते नुकसान दाखवायचे? असा प्रश्न जिल्ह््यातील अधिकाऱ्यांना पडला आहे. केंद्रीय पथकाच्या हा दौरा म्हणजे वरातीमागून घोडे... अशीच स्थिती असल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरातच चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडूनही मदत मिळण्याची मागणी होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून आता नुकसानीच्या पाहणीसाठी पथक पाठविण्यात येत आहे.समितीचा धावता दौराकेंद्र शासनाने पाहणीसाठी पाठविलेल्या अधिकाºयांकडे एक महसूल विभाग पूर्ण सोपविला आहे. या विभागातील पाच-सहा जिल्ह्यांमधील प्रतिनिधीक गावांची अवघ्या दोन दिवसांत पाहणी करून त्यांना २४ रोजी दिल्लीत बैठकीसाठी उपस्थित रहावयाचे आहे. नाशिक महसूल विभागाची जबाबदारी केंद्रीय अर्थ मंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिना नाथ व जयपूर येथील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ.सुभाष चंद्रा यांच्याकडे सोपविली आहे. हे अधिकारी नाशिक, नंदुबार, धुळे, जळगाव व नंतर अहमदनगर या जिल्ह्यांची पाहणी करणार आहेत. हे पथक धुळे जिल्ह्यातील पाहणी आटोपून २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पारोळा, एरंडोल तालुक्यातील गावांची पाहणी करीत सायंकाळी ६ च्या आत जळगावात मुक्कामी येणार आहे. कारण पाहणी अंधार पडण्याच्या आतच करावी लागणार आहे. त्यानंतर २३ रोजी सकाळी पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यातील गावांची पाहणी करीत औरंगाबादमार्गे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पाहणी करून सायंकाळपर्यंत अहमदनगरला पोहोचाणार आहेत.पाहणी कसली करणार?जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीपाचे जवळपास सर्वच पिकांचे नुकसान झाले. त्याबाबत राज्य शासनाच्या आदेशावरून प्रशासनाने पंचनामे करून भरपाईच्या मागणीचे प्रस्तावही रवाना केले. त्यानुसार मंगळवार, १९ रोजीच पहिला हप्ताही प्राप्त झाला आहे. त्यामुळे शेतकºयांनी खरीपाचे नुकसान झाले तरी जमिनीत प्रचंड ओल असल्याने रब्बीचे पीक तरी चांगले येईल, या आशेने नुकसान झालेले पीक उपटून रब्बीची लागवडही करून टाकली आहे. तर काही शेतकºयांकडून पेरणी सुरू आहे. नोव्हेंबर महिना संपत आला असल्याने रब्बीच्या पेरणीचा कालावधीही संपत आला आहे. त्यामुळे शेतकºयांकडून घाईगर्दी सुरू आहे.मागणी ६४३ कोटींची मदत प्राप्त १७९ कोटीराज्य शासनाने ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभाग, महसूल व जि.प.ला दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातही पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले. तसेच या नुकसानी पोटी जिल्ह्यासाठी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत जिरायत क्षेत्रासाठी ३१७ कोटी २३ लाख २५ हजार ४९४ रूपये, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत बागायत क्षेत्रासाठी ३०७ कोटी ७१ लाख ४४ हजार ७७५ रूपये तर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत फळपिकांसाठी १८ कोटी ६९ लाख ८२ हजार २० रुपये अशी एकूण ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार २८९ रूपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून २८ टक्के रक्कम म्हणजेच १७९ कोटी ९८ लाख १ हजार रूपये वितरीत केले आहेत.
केंद्रीय पथकाचे वरातीमागून घोडे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 1:16 PM