कापूस हे हुकमी उत्पन्न देणारे पीक मानले जाते. त्यामुळे तालुक्यात दरवर्षी बागायती कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मागील वर्षी तालुक्यात कापूस लागवडीचे क्षेत्र २५ हजार २६० हेक्टर होते. यात बागायती कापूस लागवड १६ हजार ५४० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली होती, तर जिरायत कापूस लागवड ८ हजार ७२० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली होती. मागील वर्षी पाण्याची उपलब्धता असल्याने कापसाचे लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. यावर्षीही विहिरींना पाण्याची परिस्थिती बरी आहे. त्यात गिरणा नदी व जामदा उजवा व डावा कालव्याला पाण्याचे आवर्तन मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. प्रशासनाने गिरणा धरणात पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवले आहे. मात्र, आता गिरणा नदीला पाण्याचे आवर्तन सोडण्याची आशा बळावली आहे. पाटबंधारे विभागाने तात्काळ पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे.
बियाणांची मागणी
यावर्षीही सिंचन विहिरींसह पाण्याची मुबलकता आहे. यंदा संकरित कापूस बिटी बियाणे लागवडीसाठी एकूण सव्वालाख बियाणांच्या पाकिटांची मागणी तालुका कृषी विभागाने केली आहे. जुन्या दरानेच रासायनिक खतांची विक्री होणार आहे. रासायनिक खतांची भाववाढ झालेली नाही. कापूस बियाणे व रासायनिक खतांची मुबलक उपलब्धता आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे १ जुलैनंतर बागायती कापूस पिकाची लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांनी केले आहे. बियाणे व रासायनिक खतांची खरेदी परवानाधारक कृषी केंद्रधारकांकडून करावी. पक्क्या बिलाची पावती घ्यावी. कुणी बियाणे वा रासायनिक खतांची जादा दराने विक्री केल्यास तात्काळ तालुका कृषी विभागाशी संपर्क साधावा. संबंधित दुकानदारावर परवाना निलबंनाची कार्यवाही करण्यात येईल. यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. दुकानांच्या तपासणीसही सुरुवात झालेली आहे. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी.बी. गोरडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
२९/७