लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रशासनाने हॉटेल व्यवसाय करण्यास सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत मुदत दिली आहे. खवैय्यांच्या हॉटेल्सला जाण्याच्या वेळेतच नेमकी हॉटेल्स सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या मार्च महिन्याच्या आधी जेवढा व्यवसाय होत होता. त्याच्या ३० टक्केच व्यवसाय आता होत असल्याचे समोर आले आहे.
मार्च २०२०पासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स व्यवसाय बराच काळ बंद होता. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले सर्वचजण हॉटेल मालक, चालक, स्वयंपाकी, वेटर आणि इतर जणांवर बेरोजगारीची परिस्थिती ओढावली होती. मात्र, काही महिन्यात पुन्हा एकदा हॉटेल व्यवसाय सुरू झाला. मधल्या काळात रात्री १० पर्यंत हॉटेल्सला व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हॉटेल व्यवसायाला सकाळी ९ ते रात्री ८ वाजेचे बंधन घालण्यात आले आहे.
काय आहे नेमकी अडचण?
हॉटेल व्यवसायाला खरी सुरूवात सायंकाळी ७.३० नंतर होते. त्यावेळी जेवणासाठी खवैय्ये हॉटेल्सकडे वळतात. मात्र, ८ वाजता हॉटेल बंद करायचे असल्याने ७.४५ वाजेनंतर व्यावसायिक हॉटेल्समध्ये नव्या ग्राहकांना प्रवेश देत नाहीत. सध्या फक्त दुपारी जेवढे ग्राहक जेवायला येतात. तेवढ्याच ग्राहकांवर हॉटेल व्यवसाय टिकून आहे. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये दुपारी हॉटेलमध्ये येणाऱ्यांची संख्यादेखील कमी असते. स्थानिक नागरिक दुपारी हॉटेलकडे वळतच नाहीत. तर एप्रिल आणि मे मध्ये जळगावातील तापमान पाहता बाहेरून येणारे प्रवासीही कमीच असतात. त्यामुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होऊ शकतो.
दहा टक्केपेक्षा जास्त हॉटेल्स बंद पडण्याची भीती
या पद्धतीने हॉटेल व्यवसायावर जर निर्बंध येत राहिले तर पुढच्या काही महिन्यातच १० ते १५ टक्के हॉटेल्स बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यात ज्यांचा व्यवसाय भाड्याच्या जागेत सुरू आहेत. ते जास्त अडचणीत येऊ शकतात, असे या व्यवसायातील जाणकारांनी सांगितले.
आकडेवारी
शहरातील एकूण हॉटेल्स २००
चरितार्थ अवलंबून असणारे - सुमारे अडीच हजार
होणारा व्यवसाय -
मार्च २०२० च्या आधी - दररोज २५ ते ४० लाख रुपये
मार्च २०२१ मध्ये - फक्त चार ते पाच लाख
कोट - हॉटेल व्यवसाय करणारे सध्या अडचणीत आले आहेत. येत्या काही दिवसांत किमान १० टक्के हॉटेल्स बंद होऊ शकतात. कोरोनाच्या काळात आधीच व्यवसाय बंद होता. आता पुन्हा एकदा निर्बंध आले आहेत. - लेखराज उपाध्याय, अध्यक्ष, जळगाव टुरिझम, हॉटेल्स असोसिएशन.