लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ब्रेक द चेनमध्ये हॉटेल व्यवसाय अडचणीत आला असून, केवळ पार्सल सुविधा उपलब्ध असल्याने हा व्यवसाय ५ टक्क्यांवर आला आहे. ग्राहकी नसल्याने दररोज हॉटेलचालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, जळगाव शहरातील दोन हजारांवर कर्मचारी बेरोजगार झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्याचा विविध व्यवसायांवर मोठा परिणाम होत आहे. गेल्या वर्षीदेखील अशीच परिस्थिती उद्भवल्याने लॉकडाऊनच्या काळात हॉटेल बंद राहिल्या होत्या. त्यानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने व मर्यादा घालून व्यवसायाची परवानगी देण्यात आली. हळूहळू हा व्यवसाय सुरळीत होत असताना फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला व नागरिकांनीदेखील हॉटेलमध्ये जाणे टाळणे पसंत केले. त्यानंतर ५ एप्रिलपासून ब्रेक द चेन लागू केल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंटमधून केवळ पार्सल सुविधेची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे हॉटेल व्यवसाय जवळपास ठप्प झाल्यातच जमा असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
पार्सल घेण्यासाठीही कोणी येईना
हॉटेलवर पार्सल सुविधेची परवानगी देण्यात आली असली तरी याठिकाणी पार्सल घेणाऱ्यांची संख्या कमीच आहे. बाहेर हॉटेलवर काही घेण्यासाठी आले असता पोलिसांकडून विचारणा होत असल्याने त्यापेक्षा अनेक जण बाहेर पडणे टाळत आहे. सोबतच संसर्गाची भीती मनात असल्याने अनेक जण पार्सल घेण्यासाठी येत नसल्याचे सांगण्यात आले. यात होम डिलिव्हरी करणाऱ्या काही कंपन्यांना परवानगी दिली असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत ही मागणीदेखील २५ टक्केच असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
मोठी आर्थिक ओढाताण
व्यवसाय नाही यामुळे हॉटेलमालक दडपणात आहे. त्यांना बँकांचे कर्ज, जागा भाड्याने घेतली असल्यास जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार असा खर्च सुरूच आहे. त्यामुळे हे सर्व गणित जुळविताना हॉटेल व्यावसायिकांची चांगलीच ओढाताण होत आहे.
कर्मचाऱ्यांच्या हाताला काम नाही
जळगाव शहरात जवळपास १६० लहान-मोठ्या हॉटेल असून, या ठिकाणी दोन हजार कर्मचारी कामाला आहे. मात्र या व्यवसायावर मर्यादा आल्याने सर्वच कर्मचाऱ्यांना काम मिळणे कठीण झाले आहे. हाताला काम नसले तरी अनेक वर्षांपासून हे कर्मचारी हॉटेलचालकाकडे असल्याने त्यांची मालकाकडून मदतीची अपेक्षा आहे. यात हॉटेलचालक मदतदेखील करत आहे, मात्र आवकच बंद असल्याने कुठपर्यंत मदत करणे शक्य होईल, असाही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
हॉटेलची संख्या १६०
कर्मचारी २०००
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेनमध्ये हॉटेल व्यवसाय ९० टक्क्यांहून अधिक ठप्प झाला आहे. यामुळे हॉटेलमालकांची आर्थिक अडचण होण्यासह कर्मचाऱ्यांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉटेल व्यावसायिकांवर कर्जाचे हप्ते, मासिक भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार असा आर्थिक भार असून व्यवसाय पूर्ववत सुरू होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
- संजय जगताप, सचिव, जळगाव जिल्हा हॉटेल ॲंड टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशन