लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगावातील सात व्यापाऱ्यांना ४५ लाख ६६ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या नीलेश वल्लभाई सुदाणी (वय ३९, रा. वराछा, सूरत) याने बनावट ओळखपत्राद्वारे अजिंठा चौकात हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. दोन दिवस वास्तव्य केल्यानंतर त्यांनी जळगावच्या व्यापाऱ्यांना चुना लावला. जळगाव डाळीच्या बाबतीत प्रसिद्ध असल्याने व्यापाऱ्यांना गंडा घालण्याच्या उद्देशाने आपण येथे आल्याचे त्याने पोलीस तपासात सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश सुदाणे हा २५ डिसेंबर २०२० रोजी जळगाव शहरात आला होता. अजिंठा चौकात एका हॉटेलमध्ये जयेश कुमार सोनगीर या नावाने १११ क्रमांकाची तर प्रियांक पटेल नावाने २०८ क्रमांकाची खोली बुक केली होती. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये दोन नावांची नोंद होती, त्यात प्रियांक पटेल व जयेशकुमार हे दुसरे नाव होते; परंतु जास्मिन के कोठीया (भरूच) या नावाने ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्यात आले होते, असे तपासात निष्पन्न झाले. तपासाधिकारी अतुल वंजारी यांनी अटकेतील नीलेश याला पंचनाम्यासाठी या हॉटेलमध्ये नेले होते. १११ व २०८ या नंबरच्या दोन खोल्या त्याने दाखविल्या. दरम्यान यावेळी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापक शिवकुमार जगदीश परदेशी यांचाही जबाब नोंदविला.
मालवाहू वाहनाच्या चालकावरून गवसला धागा
तपासाधिकारी यांनी या गुन्ह्यात संशयितांच्या शोधार्थ सलग तीनदा सूरतची वारी केली,मात्र संशयित हाती लागले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी ज्या मालवाहू वाहनातून डाळीची वाहतूक झाली होती. त्या वाहनाच्या चालकावर लक्ष केंद्रीत करून त्याला चौकशीकामी ताब्यात घेतले. या चालकाकडून संशयितांबाबत धागा गसवला त्यानुसार पोलिसांनी नीलेश वल्लभाई सुदाणी यास सुरतमधून अटक केली. दुसऱ्या आरोपीच्या शोधार्थ पोलिसांचे पथक राजकोटमध्ये गेले, मात्र त्याठिकाणाहून संशयित गसवला नाही. संशयितांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा गुन्हा केला असून जळगावबरोबरच गुजरातमधील व्यापाऱ्यांचीही फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे.
कोट....
या प्रकरणात पाच ते सहा संशयित निष्पन्न झाले आहेत. प्राथमिक चौकशीत या टोळीने ४५ लाख ६६ हजारांची डाळ विक्री केली आहे. हा आकडा अजून वाढू शकतो. ही टोळी व्यापाऱ्यांनाच हेरून फसवणूक करत आहे. उर्वरित संशयितांना लवकरच अटक केली जाईल.
- अतुल वंजारी, तपासाधिकारी