आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२१ : सुरक्षा रक्षक असताना वकीलाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तासभर घरात धिंगाणा घालून २८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी पहाटे अडीच ते साडे तीन वाजेदरम्यान घडली. चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी या गोष्टीचा इन्कार केला आहे.औरंगाबाद खंडपीठात वकील असलेले सिध्दार्थ भालचंद्र यावलकर (वय ४२) हे गांधी नगरात आई, वडील यांच्यासह राहतात. २० नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता आई, वडील हे इंदूर येथे गेले होते. जातांना त्यांनी घरातील सर्व दरवाजांना कुलूप लावले होते. अॅड. यावलकर हे औरंगाबादला होते. आधार पाटील हे सुरक्षा रक्षक रात्रपाळीला होते. अॅड. यावलकर यांना मंगळवारी सकाळी पोलिसांनीच घरात चोरी झाल्याची माहिती दिली.
सर्व कपाटांचे कुलूप तोडलेचोरट्यांनी लोखंडी चॅनेल गेट, मुख्य दरवाजा व किचनचे कुलूप तोडलेले होते. कटरच्या सहाय्याने हे कडी कोयंडे तोडण्यात आलेले आहेत. हॉलमधील कपाटाचे लॉकर तोडून किचनमध्ये चोरट्यांनी नासधूस केलेली आहे. पिठाचा डबा देखील उघडून पाहिला आहे. अनेक लॉक जमिनीवरच पडून होते. लॉकरमध्ये असलेले सोने व चांदीचे बॉक्स रिकामे होते. तसेच पर्सही रिकामी होती. त्यातील १५ हजार रुपये रोख, १० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या, ३ हजार रुपये किमतीचे चांदीचे ५ नाणे असा २८ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. अॅड. गुलाबसिंग पाटील, संजय राणे, दिलीप मंडोरे,शंकर जावळे व शेजारी राहणारे प्रकाश शिरसाळे यांनीघराची पाहणी केली.सुरक्षा रक्षकाचे गोलमाल उत्तरसुरक्षा रक्षक आधार पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एका कारमधून चार,पाच चोरटे आले व त्यातील दोन जणांनी माझे हातपाय बांधून एकाने तोंडात बोळा कोंबला व त्यानंतर चोरी करुन हे चोरटे निघून गेले. जाताना त्यांनीच मला सोडले असे त्याने सांगितले. दरम्यान, सुरक्षा रक्षकाच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी चौकशी करुन सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र त्यात तथ्य आढळून आले नाही. सुरक्षा रक्षक झोपलेले असताना चोरट्यांनी कटरच्या सहायाने कुलूप तोडल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी दिली. सांगळे, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळ व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.