घराला आग लागून संसार खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 6:13 PM
रावेर येथील घटनेत दीड लाख रुपपयांचे नुकसान
रावेर : शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रहिवासी सुभाष रामभाऊ पाटील हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असतांना शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कुलूपबंद घरात विजेचे शॉर्ट सर्किट होऊन अकस्मात लागलेल्या आगीत त्यांचे टी व्ही, फ्रिज, पंखा, कपडेलत्ते, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंसह सर्व संसार भस्मसात झाला. रावेर महसूल भाग मंडळाधिकारी सचिन पाटील यांनी घटनास्थळी तातडीने भेट देवून १ लाख ४५ हजार रू चे नुकसान झाल्याचा पंचनामा तहसीलदारांकडे सादर केला आहे. मुरलीधर विठोबा शिंदे यांच्या घरातील भाडेकरू सुभाष रामभाऊ पाटील हे आपल्या परिवारासह घराला कुलूप लावून लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. दरम्यान, अकस्मात आगीचा वणवा पेटला. कुलूपबंद घरातून धूराचे व आगीचे लोळ घराबाहेर पडू लागल्याने शेजारपाजारच्या लोकांनी आगीची बोंब ठोकताच परिसरातील युवकांनी धाव घेऊन दरवाजा तोडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदतकार्य केले. दरम्यान, रावेर न पा च्या अग्निशमन दलाचा बंब घेऊन दाखल झालेले दिपक पाटील, दिलीप महाजन व दिपक तायडे यांनी आगीवर मोठ्या शिताफीने नियंत्रण मिळवले.कॅप्शन - रावेर शहरातील राजे छत्रपती शिवाजी चौकातील सुभाष रामभाऊ पाटील यांच्या घरात आकस्मिक आगीने भस्मसात झालेल्या सामानाचा पंचनामा करतांना मंडळाधिकारी सचिन पाटील, आरोग्य निरीक्षक धोंडू वाणी आदी दिसत आहेत.