मोठे मासेच कसे सुटतात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 7:33 PM
रोज मरे त्याला कोण रडे अशी स्थिती
हितेंद्र काळुंखेजळगाव : जिल्हा परिषदेत पोषण आहार प्रकरण सातत्याने गाजत आहे. मात्र त्याचे सोयरेसुतक कोणालाही आता वाटेनासे होवू लागले आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशी स्थिती या प्रकरणांची झाली आहे. लहान मुलांच्या आरोग्याचा जेथे प्रश्न आहे, अशा शालेय पोषण आहाराबाबतही तक्रारी आणि घोटाळे दर महिन्याला नव्याने पुढे येत आहेत. मात्र यातून हाती काहीच लागत नाही असेच दिसून येत आहे. काही ठिकाणी पुरवठादारांचा हलगर्जीपणा तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर हलगर्जीपणा तर काही वेळेसे भ्रष्टाचार यामुळे मुलांच्या जीवाशी खेळ होत आहे. असे प्रकार नेहमीच घडत आहे. एका प्रकरणास क्लीननिट मिळाली की, दुसरे प्रकरण पुढे येते त्यालाही क्लिनचिट मिळते. असे आता वारंवार होवू लागले आहे. यामुळे तक्रारकर्त्यांचा जोशही आता कमी होवू लागला आहे. तर अधिकाºयांना तक्रारींची सवय होवून बसली. यामुळे अशा तक्रारींकडे आता केवळ सोपस्काराच्या दृष्टीतून पाहिले जात आहे. गेल्या दीड दोन वर्षापूर्वी पोषण आहाराच्या तांदुळाचा विषय गाजला असताना पुन्हा एक दोन प्रकरणं गाजली आणि आता दोन महिन्यांपूर्वीच बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण गाजले. यानंतर आसोदा येथे पोषण आहार खाल्ल्याने तिघांना विषबाधा झाल्याची तक्रार गेल्या चार- पाच दिवसात आली होती. यातही काहीच हाती लागले नाही. तर आता काल परवाच भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे पोषण आहारत किडे आणि गोम आढळली. या प्रकरणात प्रथमदर्शनी आहार चांगला आहे, असे आढळले तर आहाराची पाकिटे योग्यरित्या ठेवली नाहीत म्हणून अंगणवाडी सेविकेस जबाबदार धरले आहे. याची चौकशी होईल. झालीच तर अंगणवाडी सेविकेवर कारवाई देखील होईल परंतु जेथे मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जाते तेथे मात्र नेहमीच ते सहीसलामत सुटतात आणि झालीच कारवाई तर लहान घटकांवर होते, मात्र असेच का घडते? याचाही विचार होणे गरजेचे आहे.