लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये अजून नोकरभरतीच झालेली नाही तर या प्रक्रियेत गैरव्यवहार कसा होणार, असा प्रश्न माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.
दूध संघाच्या संचालक मंडळाने १६३ जागांसाठी सुरू केलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केला आहे, असा आरोप करीत ‘जस्टीस फॉर पीपल्स’ संस्थेचे एन.जी. पाटील यांनी ६३ कर्मचाऱ्यांच्या यादीसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याविषयी बोलताना खडसे यांनी या आरोपाचे खंडन केले आहे.
ऑनलाईन प्रक्रियेत गैरव्यवहार कसा होणार?
दूध उत्पादक संघाच्या एका बडतर्फ कर्मचाऱ्याने गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. मात्र ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून या प्रक्रियेत कुणाला काही गडबड करता येत असेल तर त्याने मला मार्गदर्शन करावे, असा चिमटाही खडसे यांनी काढला.
जिल्हा बँकेच्या धर्तीवर भरती
जळगाव जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया ऑनलाईन झाली. त्यात २५० जागा भरण्यात आल्या. त्याबाबत कुठलीही तक्रार आलेली नाही. दूध उत्पादक संघाची भरतीदेखील त्याच धर्तीवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
पैसे मागितल्यास पोलिसात जावे
दूध संघामध्ये गेल्या ५ ते १० वर्षांपासून काम करीत आहेत, त्या कर्मचाऱ्यांना या भरतीमध्ये प्राधान्याने सामावून घ्यावे, असे संचालक मंडळाचे धोरण आहे. त्यामुळे स्वाभाविकच जे या ठिकाणी काम करीत आहेत, त्यांच्या अनुभवानुसार त्यांना सामावून घेण्यासाठी ३० मार्क ठेवले आहेत. त्यापैकी त्यांना २० मार्क देण्यात येतील. उर्वरित १० मार्क कागदपत्रांचे आहेत. पण, त्यासाठी ऑनलाईन परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यात उत्तीर्ण झाल्यास त्यांना सेवेत घेता येईल. अन्यथा घेता येणार नाही. ज्या ६३ कर्मचाऱ्यांनी यादी पाटील यांनी दाखविली आहे, ते कर्मचारी आधीपासून तेथेच काम करीत आहेत. त्यांच्यामधूनच काही जणांना घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया राज्य सरकारच्या परवानगीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कुणालाही यात पैसे मागितले जात असतील तर त्यांनी पोलिसात जावे. कुणीही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहनदेखील खडसे यांनी केले.