शनिवारी रात्री १० वाजेपासून वादाला सुरुवात झाली, त्याचा शेवट रात्री १ वाजता झाला. तब्बल तीन तास फातेमा नगर व एमआयडीसीतील कंपनीत हा धिंगाणा सुरू होता. बॅट, रॉडसारख्या हत्यारांचा वापर झाला. गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती, अर्थात खरेच गोळीबार झाला की अफवाच होती, हा देखील संशोधनाचाच भाग आहे. शहरात खेळण्यासारखे सहज शस्त्र उपलब्ध होत असल्याने गोळीबार नवीन नाही, असो पण यानिमित्ताने खरा प्रश्न निर्माण होत आहे तो संचारबंदीच्या अंमलबजावणीचा. मनपा व पोलीस या दोन्ही यंत्रणा खरोखर आपले कर्तव्य पार पाडत आहेत का? पाडत असतील तर मग रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या या लोकांना कोणी हटकले नाही का, की गस्त नव्हतीच? यासारखे प्रश्न जळगावकरांच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत.
अधिकाऱ्यांची धडपड; पण यंत्रणा कामचुकार
कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांची प्रचंड धडपड सुरू आहे. प्रशासनाकडून रोज नवनवीन आदेश काढले जात आहेत. त्याचे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे तर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस व मनपावर सोपविण्यात आली आहे. तीन दिवस पूर्णपणे आस्थापना बंद राहिल्या, हा जनता कर्फ्यू असल्याने नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला, मात्र संचारबंदीत अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई होणेचे अपेक्षित असताना पोलीस किंवा मनपाकडून कारवाया होताना दिसत नाही. रात्रीची नाकाबंदी व गस्तही दिसून येत नाही. त्याचा परिणाम म्हणून शनिवारी दोन गटात दंगल झाली.