जळगाव : मला विचारल्याशिवाय टेंडर भरलेच कसे?, टेंडर तातडीने मागे घे असे म्हणत माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मक्तेदार राहूल धांडे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोघांमधील या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. दारकुंडे यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे समर्थन करतानाच आपण कुठेही पैशाची मागणी केलेली नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना स्पष्ट केले.
माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या वॉर्डात रस्ते, गटार व कन्वर्टचे काम होणार असून त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. राहूल धांडे (रा.कोल्हे नगर) यांनी रस्ता कॉक्रीटीकरण कामाचे टेंडर भरले आहे. ११ लाख रुपये किमतीचे हे काम आहे. या वॉर्डाचे नगरसेवक आपण आहोत, मला विचारल्याशिवाय टेंडर भरलेच कसे असा जाब दारकुंडे यांनी धांडे यांना विचारुन टेंडर मागे घे म्हणत धमकावले आहे. धांडे यांच्या म्हणण्यानुसार, दारकुंडे गेल्या तीन दिवसापासून फोन करुन टेंडर मागे घेण्यासाठी धमकावत आहेत. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत आहेत. आपल्याला कामाची गरज आहे, त्यामुळे टेंडर भरल्याचे धांडे सांगतात. टेंडर मागे घेण्याबाबत पत्र देण्यासाठीही त्यांनी धमकावले आहे. जिल्हा नियोजन समिती, राज्य शासन व मनपा फंडातून शहरात कामे सुरु आहेत. काही कामे नगरसेवकांनीच घेतल्याचे बोलले जात आहे तर काही कामे नगरसेवकांच्या जवळच्या लोकांनी घेतली आहेत.
शिवाजी नगरातील रस्ते कॉक्रिटीकरणाचे कामाचे ११ लाखाचे टेंडर भरले आहे. गटार व कन्वर्टचे टेंडर मी भरलेले नाही. अजूक कोणतेच टेंडर खुले झालेले नाही. नवनाथ दारकुंडे यांच्याकडून सलग तीन दिवसापासून टेंडर मागे घ्यावे म्हणून धमकी दिली जात आहे. अश्लिल शिवीगाळ केली जात आहे. यासंदर्भात आपण पोलिसात तक्रार देणार आहोत.नगरसेवकाचा स्वेच्छा निधी आहे. त्यातून हे काम होणार आहे. रस्ते, गटार व कन्वर्ट असे तिघं कामे घ्यावीत, अन्यथा रस्त्याचे काम घेऊ नये असे आपण सांगितले आहे. मलईचेच कामे घ्यावीत बाकी घेऊ नये असे चालणार नाही. आपण कुठेही पैशाची मागणी केलेली नाही. रात्री आमदारांना घेराव घालण्यात आला होता. मनमानी चालू देणार नाही.-नवनाथ दारकुंडे, माजी नगरसेवक