आरटीपीसीआरचे प्रमाण हे ६५ टक्के असावे, असा आदेशच शासनाने काढला आहे. मात्र, स्थानिक पातळीवर आधीच साडेतीन लाख चाचण्या झाल्याचे कारण सांगून चाचण्यांचे प्रमाण आहे तसेच ठेवले जात असल्याचा गंभीर प्रकार आठवडाभरापासून सुरू आहे. एक हजारापेक्षाही कमी चाचण्या होत आहेत. या मागची कारणे काय तर लोकच येत नाही. घरोघरी जाऊन चाचणी करणे तसेही अशक्यच, कॅम्प घेऊन आधीच यंत्रणा थकली आहे. प्रयोगशाळांची क्षमताही पाचशेपेक्षा अधिक नाही. शहरात एका ठिकाणी चाचण्या वाढविण्याचे म्हटल्यास दुसरे केंद्र बंद करावे लागते, मनुष्यबळाची अशी स्थिती आहे. त्यामुळे आता या चाचण्या वाढविणार कशा, असा प्रश्न असल्याने प्रशासनाने आहे तशाच चाचण्या सुरू ठेवाव्यात असे एकंदरीत ठरविल्याचे चित्र दिसतेय.
जळगाव शहरवगळता अन्य जिल्ह्यांतून चाचण्याच होत नसल्याचे गंभीर चित्र आहे. मग प्रशासनाने आता नेमकी काय भूमिका घ्यावी, असाही एक प्रश्न आहे.
कोरोना हा सतत बदलणारा विषाणू असल्याचे वारंवार समोर आले आहे. अनेक अभ्यास होऊनही याबाबतीत ठोस असे काहीच सांगता येत नाहीत, असे तज्ज्ञ म्हणतात. अशा स्थितीत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर न होणे हे गंभीर आहे, की स्थानिक परिस्थितीनुसार योग्य हे कोरोना वाढला किंवा घटला यावरून समोर येईल.