आईस्क्रीम कसे करावे?’ साधं शीर्षक-साधा विषय! प्रत्येक वेळी काहीतरी सामाजिक प्रश्न समोर ठेवूनच लिहिलं पाहिजे, असा नियम थोडाच आहे. येता-जाता सगळय़ा दुनियेतला शहाणपणा शिकवायला आपण (चष्मायुक्त) विचारवंत थोडेच आहोत? त्यामुळे त्या मोदी, ट्रम्प वगैरे मंडळींना जे करायचंय ते करू द्या.. आपण आपले आईस्क्रीम करू. कोणतीही सामाजिक किनार विनार नसलेलं. साधंसुधं आईस्क्रीम.तर ‘आईस्क्रीम’ साठी साहित्य व कृती-उन्हाळय़ातला कोणताही एक दिवस घ्यावा. शक्यतोवर एखादी शनिवार संध्याकाळ घ्यावी. थोडा मोकळा वेळ घ्यावा. पूर्वी शनिवार संध्याकाळ सोबत मोकळा वेळ ‘फ्री’ यायचा! आता कुटुंबातले, आजी-आजोबांपासून नातवार्पयतचे सगळय़ा वयाचे सदस्य घ्यावे..सोबत चार मित्रमंडळीही चवीसाठी घ्यावी. मग ‘बदाम सात’ खेळताना सत्तीचा उतारा टाकल्यासारखा विषय समोर टाकावा- ‘‘चला, आज आईस्क्रीम करू’ यावर वेगवेगळय़ा सूचना, उपसूचना, हरकतीचे मुद्दे होतील. पण त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करावे. कारण, नंतर प्रत्येकालाच ते आईस्क्रीम हवंस असतं, इथे ‘आईस्क्रीम’ एवढाच प्रस्ताव पुरेसा आहे. प्रत्यक्षात त्यात आंब्याच्या फोडी आणि रस टाकायचा असतोच; पण ‘मँगो आईस्क्रीम’ असा अनावश्यक तपशील देण्याची काहीही गरज नाही. घरच्या आईस्क्रीममध्ये आंब्याशिवाय इतर काहीही टाकलं तर ती ‘भेसळ’ असते. त्यात ‘कस्टर्ड पावडर’ नावाचा आंग्ल प्रकृतीचा पदार्थ टाकणे, हे तर पूर्णपणे निषिद्ध आहे. आईस्क्रीम करण्यासाठी आधी लाकडी ‘पॉट’ मिळवावा लागतो. तो विकत आणायचा नसतो. तो संध्याकाळीच आणून ठेवावा लागतो. कारण तो आधी पाण्यात बुडवून ठेवावा लागतो म्हणजे बाहेरच्या लाकडी फळय़ा पाण्याने फुगतात आणि त्यातून मिठाचं पाणी गळत नाही. या दरम्यान माणसी पाव लीटर दूध ‘पकडायचं’ की अर्धा लीटर ‘पकडायच’ यावर एखादा परिसंवाद झाला पाहिजे. अशा वेळी मग चार लीटरही राहू द्या, आणि दहा लीटरही राहू द्या; असं म्हणून सात लीटरवर तोडपाणी होते. म्हणजे मग नंतर आईस्क्रीम कमी पडलं, तरी किंवा जास्त झालं तरी- ‘बघा, मी आधीच सांगत होतेना?’ असं म्हणायला दोन्ही पक्षातून गडी तयार असतात. निवडणुकीतल्या पराभवासारखीच आईस्क्रीमच्या चुकलेल्या अंदाजाची जबाबदारी नेहमीच सामूहिक असलेली बरी. बर्फाची लादी आणि जाड काळं मीठ या दुर्मिळ गोष्टी कुठे मिळतात, हे फक्त ठरावीक माहितगार लोकांनाच ठावूक असतं. उन्हं उतरली, की गच्चीवरती किंवा अंगणात दोन-तीन बादल्या पाण्याचा सडा टाकून ठेवावा. नंतर एखाद्या कोप:यात काटकोनात गाद्या टाकून ठेवाव्या. ही प्राथमिक तयारी पूर्ण झाली की, मग तरुण आणि होतकरू मंडळींना पुढे बोलावून लोखंडी बत्त्याने बर्फ फोडायला सुरुवात करावी. नंतर लाकडी पॉटमध्ये आधी गोल फिरणारं स्टीलचं भांडं नीट ठेवावं. भांडय़ात काळजीपूर्वक दूध आणि आंबा (रस आणि/अथवा फोडी) ओतावे. निम्म्यापेक्षा थोडं जास्त भरावं. वर्किग कमिटीच्या सदस्यांप्रमाणेच हे मिश्रण फार कमी पण नको, आणि फार जास्त पण नको. नंतर लाकडी पॉट अािण स्टीलचे भांडे यांच्या दरम्याच्या मोकळय़ा जागेत बर्फाचा चुरा टाकावा. शिवाय अधूनमधून, मोकळय़ा जागांवर नातेवाइकांची भरती करावी, तसं मोकळय़ा जागेत मीठ भरावं. आता आईस्क्रीम करण्याची पद्धत बघू या-‘तय्यार’ झालेला पॉट फिरवायला एकेकाचे नंबर लागतात. प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पॉट फिरवायचा. कडबोळय़ाच्या नगरपालिकेत प्रत्येकाला पाळी-पाळीने नगराध्यक्ष पदाचा ‘चनान्स’ मिळतो. तसा फिरवता फिरवता अचानक कुणाला तरी तो पॉट ‘जड’ लागायला लागतो. त्याबरोबर सगळय़ांचे चेहेरे प्रफुल्लीत होतात. ‘थांबा-थांबा अजून..’’ आणि ‘उघडा हो, उघडा लवकर..‘ अशा परस्पर विरोधी सूचनांमध्ये कोणीतरी झाकण उघडतं- आणि बघता बघता भांडय़ातलं आईस्क्रीम काचेच्या बाऊलमध्ये आणि तिथून पोटात रवाना होतं. - अॅड. सुशील अत्रे
आईस्क्रीम कसे करावे.. - अॅड. सुशील अत्रे
By admin | Published: April 24, 2017 12:49 PM