नितीन लढ्ढांनी उपस्थित केला प्रश्न : महासभेत धोरण निश्चित करणार, आयुक्तांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होण्यास केवळ तीन महिने शिल्लक आहेत. मात्र, अजूनही वॉटरमीटरसह अपार्टमेंटच्या नळजोडणीसंदर्भात कोणताही निर्णय मनपा प्रशासनाने घेतलेला नाही. अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांमध्ये, नागरिकांमध्ये नळजोळणीबाबत संभ्रम असून, ब्लॉकधारकांना कोणत्या प्रकारचे नळकनेक्शन मिळेल, यावर कोणताही निर्णय मनपाने घेतलेला नाही. याबाबत शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर आयुक्तांनी यावर धोरण निश्चितीसाठी दोन दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे जाहीर केले.
मनपा स्थायी समितीच्या सभेत या विषयावर देखील चर्चा झाली. अमृत योजनेंतर्गत मालमत्ताधारकांना घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याची पावती दाखविल्यानंतर नळजोडणी दिली जात आहे. मात्र, एकाच अपार्टमेंटमधील आठपेक्षा जास्त ब्लॉकधारकांना कोणत्या प्रकारचे कनेक्शन द्यायचे, याबाबत अद्याप प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. बऱ्याच भागात जलवाहिनी टाकण्याचे व नळकनेक्शन देण्याचे काम पूर्ण होत आहे, अशा परिस्थितीत नवीन योजनेतून पिण्याच्या पाण्यासाठी अपार्टमेंटमधील नागरिकांनी नळजोडणी मिळण्याची मागणी केली आहे. मात्र, अपार्टमेंटला एक जोडणी द्यायची की सर्व रहिवाशांना स्वतंत्र जोडणी द्यायची, याबाबत मनपा प्रशासनदेखील संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नितीन लढ्ढा यांनी केली. मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी यासंदर्भात महापौरांकडे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन धोरण ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत या बैठकीबाबत कळविण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.