लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामातील अडथळे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करून महामार्गाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्यानंतर तीन दिवसांनीदेखील अजिंठा चौफुलीच्या पुढे महामार्गाला लागून जैसे थे स्थिती असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला ट्रकचे काम सुरू असण्यासह विविध वस्तूंचे दुकानेदेखील कायम आहे.
शहरातील रस्ता सुरक्षा व ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी रोजी बैठक झाली होती. त्या वेळी महामार्गाच्या कामाला गती देण्यासंदर्भात संबंधित विभागांना सूचना दिल्या होत्या. त्या वेळी या विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असेही निर्देश दिले होते. संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित असतानाही तातडीने काम मार्गी लागले नसल्याचे चित्र आहे.
कामात अडथळे कायम
अजिंठा चौफुलीपासून पुढे रस्त्यावरच ट्रक दुरुस्तीचे काम केले जाते, महामार्गाच्या दोन्ही बाजूस विक्रेते दुकान मांडून वस्तुंची विक्री करतात त्यामुळेही वाहतूक कोंडी होवून रस्त्याच्या कामात अडथळे येतात. याबाबत पोलीस, परिवहन व महापालिकेने संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले होते. याला आता तीन दिवस झाले तरी संयुक्त कारवाई झाली नाही व या रस्त्यावरील ट्रक दुरुस्ती अजूनही न थांबल्याने येथे अडथळे कायम असल्याचे चित्र आहे.
रस्त्याच्या कामात अडथळ्यासह वाहतूक कोंडीत भर
शहरातील व महामार्गावर असणाऱ्या चौफुलींवर वाहतूक कोंडी होणे आता नित्याचे झाले आहे. त्यात अजिंठा चौफुली येथे केवळ सकाळ-संध्याकाळच नव्हे तर आता दिवसभर वाहतुकीची कोंडी होत असल्याची समस्या वाढत आहे. यात भुसावळवरून येताना कालिंका माता मंदिर ते थेट अजिंठा चौफुलीपर्यंत रस्त्याच्या कडेला वाहनांची दुरुस्ती करण्यासह विविध वस्तूंच्या विक्रीचे दुकाने असल्याने वाहनांची गती कमी होते व वाहतूक कोंडी वाढत जाते, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे.
धुळीचा प्रचंड त्रास
अजिंठा चौफुली ते कालिंका माता मंदिर या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागण्यासह रस्त्याच्या कडेला ट्रकचे काम करीत असताना ते सुरू करून पाहिले जातात. यामुळे मोठमोठा आवाज होण्यासह धुळीचाही मोठा त्रास वाढल्याचे या भागातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
तातडीच्या सूचना असताना अंमलबजावणी कधीमहामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहे. मात्र तीन दिवसांनंतरही जबाबदारी सोपविलेल्या महापालिका, पोलीस, परिवहन विभागाकडूने अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.