डमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दुसरी लाट ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यात बालकांना अधिक धोका असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही शासकीय यंत्रणेत काही सुविधा उभ्या केल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण आरोग्य यंत्रणेत बालरोगतज्ज्ञ अगदीच बोटावर मोजण्याइतके असल्याने बालरोगतज्ज्ञांची फौज नसताना ही तिसरी लाट रोखणार कशी, असा प्रश्न उभा राहिला आहे. आरोग्य केंद्रांमध्ये एकही बालरोगतज्ज्ञ नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्हाभरात कोविडबाधित लहान मुलांसाठी त्यातही गंभीर बाधित मुलांसाठी सद्य:स्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी नवजात शिशू काळजी कक्ष विभाग तसेच लहान मुलांचा कक्ष अशी व्यवस्था आहे. यासह या ठिकाणी व्हेंटिलेटर व बेड वाढविण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयांत आतापर्यंत ३५ ते ४० बाधित बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. यात अनेक गंभीर बालकांना बरे करून घरीही सोडण्यात आले आहे. शहरात ही व्यवस्था आहे. मात्र, एकाच व्यवस्थेवर अवलंबून राहणे आगामी तिसऱ्या लाटेत परवडणारे नसून अन्य पर्यायांवर काम होणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. अशा स्थितीत मोहाडी रुग्णालयाच्या विस्तारातही लहान मुलांसाठी एका कक्षाचे नियोजन केले जात आहे.
आरोग्य केंद्र : ७७
बालरोगतज्ज्ञ : ००
उपजिल्हा रुग्णालय : ३
बालरोगतज्ज्ञ : ४
जिल्हा रुग्णालय : १
बालरोगतज्ज्ञ : १०
एकूण रुग्ण १३९१३७
बरे झालेले रुग्ण : १३००५७
उपचार घेत असलेले रुग्ण : ६५७०
१५ वर्षांखालील रुग्ण : ८५७६
१५ वर्षांखालील मृत्यू : ०५
ग्रामीण भागात स्थिती वाईट
आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन डॉक्टरांची नियुक्ती आहेत. यात काही एमबीबीएस डॉक्टरांचा समावेश आहे. यासह जिल्हाभरातील २६५ उपकेंद्रांमध्ये सीएचओ अर्थात समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये बालरोगतज्ज्ञ नाहीत, त्यामुळे थोडीही गंभीर परिस्थिती उद्भवल्यास ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे स्थानिक पातळीवर तातडीने गंभीर बालकांना उपचार मिळतील, याची सध्यातरी शाश्वती नाही. त्यामुळे सध्याची मनुष्यबळाची व यंत्रणेची स्थिती पाहता ग्रामीण भागात परिस्थिती बिकट आहे.
मोहाडीला ५० बेडचे नियोजन
मोहाडी येथील महिला रुग्णालयाचा कोविडच्या रुग्णांवर उपचारासाठी आणखी विस्तार करण्यात येणार आहे. यात आगामी तिसऱ्या लाटेसाठी ५० बेडचे नियेाजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व आवश्यक साहित्य हे रुग्णालयात आणण्यात आले आहे. यासह जीएमसीत वाढीव व्हेंटिलेटरचे नियोजन करण्यात येत आहे. या ठिकाणीही बेड वाढविण्यात येणार आहेत.
कोट
रावेर, जामनेर, चोपडा, मुक्ताईनगर या ठिकाणी बालरोगतज्ज्ञ आहेत. यासह जीएमसी, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वतंत्र बालरोग विभाग आहेत. या ठिकाणी पुरेशी यंत्रणा आहे. मोहाडी येथे स्वतंत्र कक्ष करण्यात येणार असून, खासगी डॉक्टरांचीही यात मदत घेण्यात येईल.
- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक