लोकमत न्यूज नेटवर्क
सायगाव, ता. चाळीसगाव : येथील अत्यंत गरिबीत जीवन जगणारा शेतकरी चिला तोताराम माळी यांच्यावर संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. सायगाव येथे दि. ८ तारखेला झालेल्या घटनेमध्ये राकेश चिला माळी (२०) आणि सुकदेव जगन जाधव (१८) या दोन्ही आतेभाऊ-मामेभाऊ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सायगाव येथील शेतकरी चिला तोताराम माळी यांचा एकुलता एक मुलगा राकेश याचा मृत्यू झाल्याने चिला माळी यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. चिला माळी हा अत्यंत गरीब व सर्वसाधारण. चिला माळी हा जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे. शिक्षण ९वीपर्यंत झालेले आहे. चारही भावंडे विभक्त झाल्याने शेतीची पूर्ण जबाबदारी अपंग असतांना त्यांच्यावर आली आणि ९ वीपर्यंतची शाळा सोडल्यानंतर शेतात आजपर्यंत काबाडकष्ट करून आपल्या संसाराचा गाडा हाकतो आहे.
चिला माळी यांना मुलगा, मुली, पत्नी जनाबाई असा सुखी संसार आहे. एकुलता एक मुलगा राकेश शिकून मोठा झाला. त्याने १२ वीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखा घेऊन पूर्ण केले व पुढे पिलखोड येथीत आयटीआयमध्ये प्रवेश घेऊन तो शिक्षण पूर्ण करत होता. चिला माळी व पत्नी जनाबाई हे राकेशचे शिक्षण बघून अत्यंत आनंदी होते. राकेशने एवढे शिक्षण करून आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून मदत करू लागला होता. चिला माळी हेदेखील आनंदी होऊन ‘मला जोडबळ मिळाली, आता माझे कष्ट कमी होतील’, असा मनोमन विचार करत असत. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते आणि चिला माळी यांच्यासाठी दि. ८ जुलै एक काळा दिवस ठरला. जे व्हायचे नव्हते तेच झाले आणि राकेश अहिरे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
चिला माळी आणि पत्नी जनाबाईवर सर्वात मोठा आघात झाला आणि कधी न भरणारी पोकळी निर्माण झाली. आपल्या पोटचा गोळा गेल्याने पती-पत्नीने हंबरडा फोडला. मुलगा गेल्याने त्यांचे कष्ट पुन्हा नव्याने सुरू झाले आहेत आणि दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या चिला माळी यांना जावे तर कोणाकडे जावे? असा यक्ष प्रश्न आ वासून उभा आहे.
100721\10jal_11_10072021_12.jpg
राकेश चिला माळी