निमित्त झालं ते ‘‘गोरक्षण’’ या विषयाचं. गोवंश हत्याबंदी आणि गोरक्षण या मुद्यांवरून सोशल मीडियावर घनघोर पोस्ट युद्ध सुरू होतं. त्या सुमारास एका (अर्थातच्) विचारवंतांची पोस्ट माङया वाचण्यात आली. त्यात (अर्थातच्) गोरक्षणाची भरपूर टिंगल केली होती. त्यात नवल काही नाही. पण पुढे त्याने चिडून चिडून लिहिलं होतं, की ‘तथाकथित संस्कृती रक्षकांना’ आंधळी श्रद्धा ठेवण्यापलीकडे गायीबद्दल काहीही माहिती नसते.
शास्त्रशुद्ध अभ्यास हा आपला पिंडच नाही, आणि ब्रिटिश अभ्यासकांमुळे आपल्याला ‘झुलॉजी’ची - प्राणिशास्त्राची खरी ओळख झाली.. वगैरे वगैरे. तो पुरोगामी विचारवंत असल्यामुळे ‘भारतीय’ असलेल्या कशातही काही अर्थ नाही, असं त्याचं मत असणं अपेक्षित होतं. त्याला उत्तर म्हणून मी हे लिहितोय. असं अजिबात नाही. (मैं येडों के मूँह नही लगता..) पण या निमित्ताने एका अप्रतिम ग्रंथाची माहिती द्यावी. असं मनापासून वाटलं; म्हणून लिहितोय.
सुमारे तेराव्या शतकात भारतात ‘हंसदेव’ या नावाचे एक जैनमुनी होऊन गेले. ते निसर्ग अभ्यासक म्हणून त्या काळी प्रसिद्ध असावे. त्यांनी रचलेलं ‘मृग पक्षिशास्त्र’ आज सुदैवाने उपलब्ध आहे. त्याची मूळ संस्कृत प्रत बडोद्याला महाराजा सयाजीराव विद्यापीठात आहे. त्या संस्कृत ग्रंथाचं मराठी रूपांतर प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी कै.नरसिंह शास्त्री भातखंडे यांच्या साहाय्याने अंदाजे 1974च्या सुमारास केलं आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे दिलं. ते या मंडळाने शासकीय तत्परतेने लगेच अठरा वर्षानी, म्हणजे 1993 मध्ये प्रकाशित केलं. भारतीयांना झुलॉजीची ओळख ब्रिटिशांमुळे झाली असं जर कुणाला वाटत असेल, तर त्याने हे पुस्तक एकदा नजरेखालून घालावं.
जिननगरीचा राजा शौडदेव याच्या आ™ोवरून हंसदेव यांनी हा ग्रंथ लिहिला, असं त्यांनी स्वत:च सुरुवातीला नमूद केलं आहे. लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, शौडदेव राजाने त्याच्या दरबारात जाहीरपणे विचारलं की, पशू-पक्ष्यांबाबत लिहू शकेल असा कोणी तज्ज्ञ आहे का? त्यावर राजाच्या एका मंत्र्याने हंसदेवाचं नाव सुचवलं. म्हणजे हंसदेव हे नुसतेच निसर्ग-अभ्यासक होते असं नव्हे, तर एक तज्ज्ञ म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्धही होते. त्यांना पशू-पक्षीतज्ज्ञ म्हणून समाजात मान होता. या ग्रंथावरून हेही दिसून येतं की, हंसदेव यांनी ग्रंथ लिहिताना काही प्रमाणात पूर्वसुरींनी दिलेली माहिती उपयोगात आणली तर काही माहिती स्वत: राना-वनात फिरून, पशु-पक्ष्यांचे निरीक्षण करून गोळा केली आहे. म्हणजेच अगदी आजच्या आधुनिक अभ्यासकांच्याच पद्धतीने त्यांनी त्या काळी, तेराव्या शतकात अभ्यास केला होता. आपल्या गं्रथाच्या शेवटी ‘शास्त्रपरिसमाप्ती’ या मथळ्याखाली त्यांनी मोठय़ा तसेच लहान पशू-पक्ष्यांचे निरीक्षण वेगवेगळे कसे करावे, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
आता बघा-पहिल्याच ‘श्रेणीत’ त्यांनी सिंहाचं वर्णन दिलंय. ते म्हणतात, सिंहाच्या सहा जाती आहेत, सिंह, मृगेंद्र, पंचास्थ, हर्यक्ष, केसरी आणि हरी! रंग, रूप, आकार, वागण्याच्या पद्धती त्यांच्या आधारे त्यांनी यातल्या प्रत्येक जातीच्या सिंहाचे अगदी तपशीलवार वर्णन केलं आहे. तशाच कावळ्यांच्या बारा, तर मोरांच्या सहा जाती असल्याचं ते नमूद करतात.
हंसदेव यांनी विविध पशू-पक्ष्यांची कमाल जीवन मर्यादासुद्धा ग्रंथात दिलेली आहे, आणि विशेष म्हणजे ती आजच्या प्राणिशास्त्राच्या अभ्यासानुसार निश्चित केलेल्या वयोमर्यादेला अगदी जवळ जाणारी आहे. या शिवाय दोन वेगवेगळ्या जातींच्या प्राण्यांचा संकर कसा होऊ शकतो आणि अशा संकरित क्रॉसबीड-प्राण्यांच्या गुणधर्मात फरक कसा पडतो, याचंही निरीक्षण त्यांनी केलंय. कोणते प्राणी (राजाने) पाळावेत आणि त्याने कुठे ठेवावं, त्यांची काळजी कशी घ्यावी, कोणत्या प्राण्यांना सहज प्रशिक्षित करता येतं आणि कुणाला नाही, या संबंधी बारीक-सारीक माहितीसुद्धा हंसदेव देतात. कमालीचा शास्त्रशुद्ध ग्रंथ!
आणि हो, जाता-जात पुन्हा आठवण करून देतो- हंसदेव भारतीय होते. तेराव्या शतकातले होते. त्यांच्या काळी ‘ब्रिटिश शास्त्रज्ञ’ नव्हते, आणि त्या काळी इंटरनेट किंवा गुगलसुद्धा नव्हतं! नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी त्यांच्यानंतर सहाशे वर्षानी स्थापन झाली!
- अॅड.सुशील अत्रे