ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 18- चैतन्यमय प्रकाशपर्वाचा गुरुवारी महत्त्वपूर्ण दिवस. या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बुधवारी जळगाव शहरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. सुवर्ण बाजारही सलग दुस:या दिवशी फुलला होता. जळगावच्या बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी सकाळपासून सायंकाळर्पयत बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. गेल्या आठवडय़ापासूनच बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. बुधवारी महात्मा गांधी रोड, फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट या परिसरात कपडय़ांच्या खरेदीसाठी तरुणाईसह पुरुष, महिला, लहान मुलांची गर्दी झालेली होती. या सोबतच टॉवर चौक ते घाणेकर चौक या दरम्यान पूजेच्या साहित्यासह विविध वस्तूंची दुकाने थाटली होती.
पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी लगबगबाजारपेठेत थाटलेल्या पूजा साहित्याच्या प्रत्येक दुकानावर गर्दी झालेली होती. केरसुणी, लक्ष्मीची मूर्ती, लाह्या-बत्तासे यांची मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आली. लक्ष्मीच्या मूर्ती 60 रुपये ते 400 रुपयांर्पयत उपलब्ध आहे. या सोबतच लक्ष्मीपूजनात अनन्य महत्त्व असलेल्या केरसुणी 20 रुपये 40 रुपये प्रति नग विक्री होत आहे. यामध्ये लहान आकाराच्या केरसुणींनादेखील मागणी असून त्या 15 रुपयांपासून उपलब्ध आहे. या सोबतच लाह्या 60 रुपये किलो तर बत्तासे 70 ते 80 रुपये किलोने विक्री होत आहे.
विविध रंगांच्या रांगोळींना मागणीलक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी अंगणात रांगोळी काढण्यालादेखील मोठे महत्त्व असल्याने विविध रंगांच्या रांगोळींनी दुकाने सजली आहेत. पांढरी रांगोळी 10 रुपये किलो विक्री होत असून पाच रुपयांपासून पाकीट उपलब्ध आहे.
चोपडी पूजनासाठी खरेदीव्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. यामुळे यासाठी चोपडी (वह्यांची) देखील आज मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. लहान आकारापासून मोठय़ा आकारातील वह्या, रजिस्टर यांची खरेदी करण्यात आली. 20 रुपयांपासून 400 रुपयांर्पयतच्या वह्यांना मागणी होती. घर, अंगण उजळून टाकणा:या पणत्या विविध आकार, प्रकारात विक्रीस आल्या असून त्यांचीही मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. या सोबतच बोळकेदेखील वेगवेगळ्य़ा रंगात उपलब्ध आहेत. दरवाजा, देव्हा:यासमोर लावण्यात येणारे रंगीत पावले, वेगवेगळ्य़ा नक्षी, स्वस्तिकचे स्टीकरच्या दुकानांवरही गर्दी झाली होती. दहा रुपयांपासून 80 रुपयांर्पयत हे स्टीकर उपलब्ध आहे.
फुले मार्केटमधील वाहनतळ फुल्ल महात्मा फुले मार्केटमध्ये आज वाहनतळही अपूर्ण पडले. तेथे वाहने लावण्यास जागा नव्हती. अनेक जण बाहेर इतरत्र वाहने लावून खरेदी करताना दिसून आले.
वाहनधारकांची कसरतसंध्याकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी एवढी गर्दी वाढली की, रस्त्यांवरून वाहने काढणेदेखील कठीण झाले होते. त्यामुळे टॉवर चौक, चित्रा चौक, नवीपेठ या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
वाहनांना वाढली मागणीचारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात बुकिंग करण्यात आले असून दिवाळीला 100च्यावर चारचाकी वाहनांची विक्री अपेक्षित असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शहरात एकाच दालनात 110 चारचाकींचे बुकिंग झालेले आहे. दुचाकींना देखील मागणी वाढली असून 200 दुचाकींची विक्री अपेक्षित आहे.
सुवर्णबाजारात दुस:या दिवशीही गर्दीजळगावातील सुवर्णबाजारात सोने खरेदीसाठी आज सलग दुस:या दिवशी गर्दी कायम होती. धनत्रयोदशीला मंगळवारी मोठय़ा प्रमाणात सुवर्ण खरेदी झाल्यानंतर बुधवारीदेखील सुवर्णपेढय़ा गजबजून गेल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनादेखील मोठी मागणी होती.
सोने खरेदीसाठी आजही गर्दी होती. धनत्रयोदशीला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आजही सोने खरेदीस चांगला प्रतिसाद होता. - मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर.सी. बाफना ज्वेलर्स.
चारचाकी वाहनांच्या खरेदीस चांगला प्रतिसाद असून दिवाळीसाठी 110 वाहनांचे बुकिंग झालेले आहे. - राजू निकुंभ, महाव्यवस्थापक, मानराज मोटर्स.