ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 7 - दुर्बीणीद्वारे विविध आजारांचे निदान व योग्य उपचार करणे तसेच शस्त्रक्रियादेखील केल्या जात असल्याच्या तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन बदल आणले. आता याही पुढे जाऊन ‘कॅप्सूल इंडोस्कोपी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे केवळ एक कॅप्सूल घेऊन शरीराला स्पर्शही न करता मानवी शरीराचे परीक्षण करणे शक्य असल्याचा सूर ‘आयएमए’च्या राज्यस्तरीय परिषदेत उमटला. वैद्यकीय क्षेत्रातील अशा विविध विषयावरील मार्गदर्शनाद्वारे या परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील डॉक्टरांना नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यात आली. दरम्यान, या परिषदेचा रविवारी संध्याकाळी यशस्वी समारोप झाला. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र आणि आयएमए जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने ‘अॅम्सकॉन 2017’ या अॅॅकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटी यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे जळगाव येथील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्याचा रविवारी संध्याकाळी समारोप झाला. डॉक्टरांच्या अभ्यासाच्यादृष्टीने आयोजित केल्या जाणा:या या परिषदेत दोन दिवसांमध्ये नवनवीन शोध, उपचारपद्धती, तंत्रज्ञान अशा एकूण 24 वेगवेगळ्य़ा विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सध्या कर्करोगासारख्या आजाराचे प्रमाण विविध कारणांनी वाढत आहे. याचे अचूक निदान वेळीच झाले तर योग्य उपचार मिळण्यासह शस्त्रक्रियाही टाळणे शक्य असल्याचे डॉ. ऋषिकेश चौधरी यांनी सांगितले. ‘पंचन संस्थेचे दुर्बीर्णीद्वारे परीक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया तर केल्या जातातच, स्वादूपिंड, पित्ताशयातील खडे, अन्ननलिका, जठर, आतडे यांच्या आजारांसह कर्करोगाचेही निदान दुर्बीणीद्वारे करता येऊ शकते. यामुळे शस्त्रक्रियेपूर्वीच पहिल्याच टप्प्यात योग्य उपचार करता येणे शक्य झाले असल्याचे सांगितले. ‘कॅप्सूल इंडोस्कोपी’ने क्रांतीदुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यापाठोपाठ आता शरीराला कोणतेही उपकरण न जोडता अथवा केबल, नळीतून निरीक्षण न करता ‘कॅप्सूल इंडोस्कोपी’ तंत्रज्ञानाने क्रांती आणली आहे. ही उपचारपद्धती जळगावातही उपलब्ध झाली असून या विषयी उपस्थित इतरही डॉक्टरांना माहिती देण्यात आली. आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. विश्वेश अग्रवाल, परिषदेचे प्रमुख पॅट्रन माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहसचिव डॉ. राधेश्याम चौधरी, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. विलास भोळे, सचिव डॉ. स्नेहल फेगडे यांच्यासह संघटनेच्या पदाधिका:यांनी परिश्रम घेतले. जळगावात आणखी मोठी परिषद - डॉ. अशोक तांबेजळगावात झालेली ही परिषद यशस्वी ठरली असून यामधून राज्यभरातील डॉक्टरांना वेगवेगळ्य़ा विषयांची सखोल माहिती मिळाली. त्यामुळे भविष्यात याहीपेक्षा मोठी परिषद जळगाव येथे घेण्यात येईल, असा मानस आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी व्यक्त केला. डॉक्टरांच्या हितासाठी कार्य सुरूच -डॉ. राजेश पाटीलडॉ. राजेश पाटील यांनी सांगितले की, डॉक्टरांसाठी नवनवीन काय आहे, याचा शोध घेत त्यांच्या हितासाठी जे काही असेल ते करीत राहू व यापुढेही जळगावात अशा परिषदांसाठी आपली तत्परता असेल, अशी ग्वाही दिली.