जळगाव / नशिराबाद : जळगाव खुर्द भागामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागातील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविदयालयाच्या २ ते ३ किमी अंतरावर असलेल्या एका शेतामध्ये मानवी शरीराच्या काही भागाचे हाडे सापडले आहे. त्यामध्ये मानवी कवटी आणि इतर भागांचा समावेश आहे. ही घटना १६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली असून वीस दिवसानंतर नशिराबाद पोलिस ठाण्यात शुक्रवारी प्राध्यापकाच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रा.धनंजय सतरकर, डॉ.पुनमचंद सपकाळे, नारायण पाथरवट असे १६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डॉ.उल्हास पाटील कृषी महाविदयालच्या २ ते ३ अंतरावर असलेल्या शेताकडे फेरफटका मारत असताना, त्यांना एक मानवी कवटी आणि हाडे दिसून आली होती. त्याच्याजवळ जावून पाहिल्यावर त्याठिकाणी आधारकार्ड, मोबाईल व काही कपडे पडलेले मिळून आले होते. ही घटना त्यांनी लागलीच नशिराबाद पोलिसांना कळविली होती. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अनिम मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळूंखे, समाधान पाटील, शिवदास चौधरी यांनी घटनास्थळी जावून कवटी आणि हाडे व आधारकार्ड, मोबाईल, कपडे ताब्यात घेतले होते.असा लागला मृताचा तपास...आधारकार्डवर रामा उरॉव (रा.मोकार्या उरॉव, पोस्ट भौंरा, थाना भण्डारा, जि.लोहरदगा, झारखंड) असे नाव लिहिलेले होते. त्याच व्यक्तीचा मृतदेह असावा म्हणून पोलिसांनी आधारकार्डवरील पत्त्यावर शोध सुरू केला. त्यानंतर सीमवरूनही ओळख पटली. नातेवाईकांना आधारकार्ड आणि कपडयाचे फोटो पाठविल्यानंतर त्यांनी ते ओळखले. दरम्यान, कामानिमित्त मित्रांसोबत ते गुजरात येथे निघाले होते, अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. तर त्यांना दारूचे व्यसन असल्याचेही त्यांनी सांगितले.पोलिसांचा तपास सुरू असताना त्यांना त्या व्यक्तीच्या मित्रांशी सुध्दा संपर्क झाला. त्यांनी रामा हा आमच्यासोबत झारखंडहून गुजरातसाठी रेल्वेने निघाला होता. पण, दारू पिण्यासाठी तो भुसावळ येथे उतरला होता, त्यानंतर त्याची रेल्वे सुटल्याची माहिती पोलिसांना दिली.श्वानांनी तोडले असावे लचके...रामा हा फिरता-फिरता डॉ.उल्हास पाटील कृषी महाविलयाजवळील शेतामध्ये गेला असावा, उन्हामुळे त्याचा मृत्यू होवून श्वानांनी त्याचे लचके तोडले असावे, त्यामुळे शेतात हाड विखुरलेल्या अवस्थेत होती, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, पोलिसांचा सुरू असलेला तपास आणि प्राध्यापक बाहेरगावी गेले असल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद होण्यास विलंब झाला. प्राध्यापकाने शुक्रवारी खबर दिल्यानंतर नोंद करण्यात आली आहे.तपासणीसाठी कवटी, हाडे पाठविणारकवटी आणि हाड हे रामा उरॉव याचेच आहे की, दुस-या कुणाचे यासाठी नशिराबाद पोलिस कवटी आणि हाडे नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविणार आहे.पुढील तपास राजेंद्र साळूंखे करीत आहेत.