जळगाव : सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने जगात सर्वत्र थैमान घातले आहे. या आजारामुळे माणूसच माणसापासून दूर जायला लागला आहे. एकीकडे सरकार म्हणते रोगाशी लढा, रोग्याशी नाही तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णाला सहानुभूती ऐवजी त्याचा तिरस्कारच जास्त केला जात आहे. यानिमित्ताने माणसाची खरी ओळख कळू लागली आहे. असाच प्रकार मंगळवारी पिंप्राळ्यातील वाणी गल्लीत घडला. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या महिलेला कोरोनाच्या धाकाने खांदा द्यायलाही कोणी पुढे आले नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन या महिलेला खांदा देऊन विधीवत अंत्यसंस्कार करुन माणुसकी धर्म जोपासला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळ्यातील वाणी गल्लीतील लिनाबाई सोनार (६१) या महिलेला मंगळवारी सकाळी चहा घेताना घरातच हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. या महिलेचा पती बडोदा येथे वास्तव्याला असून दोघंही विभक्त झालेले आहेत. एक भाऊ शहरात तर दुसरा भाऊ वरणगाव येथे वास्तव्याला आहे. त्यामुळे महिलेजवळ कोणीच नव्हते. त्यांच्या मृत्यूची माहिती दोघं भावांना देण्यात आली, त्यानुसार ते आले. मात्र खांदा देण्यासाठी चार जण लागणार असल्याने कोणीही पुढे आले नाही. हा प्रकार शेजारीच राहणाऱ्या भाजप महिला आघाडीच्या मंडळ अध्यक्षा निता परदेशी यांच्या लक्षात आला. त्यांनी महानगर मंडळ पाचचे अध्यक्ष शक्ती महाजन व उपाध्यक्ष राहूल लोखंडे यांच्या कानावर हा प्रकार घातला. महाजन व लोखंडे यांनी स्वत: पुढाकार घेऊन महिलेला खांदा देऊन अंत्यविधीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडून समाजात एक आदर्श निर्माण केला. महिलेचे दोन भाऊ, भाजपचे महाजन, लोखंडे, नितू परदेशी, सरचिटणीस उमेश सूर्यवंशी, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महेश ठाकूर यांनीही या कामात सहकार्य केले. या लोकांच्या व्यतिरिक्त गल्लीतील कोणीही अंत्ययात्रेत सहभागी झालेले नव्हते. कोरोना बाधित नसतानाही या महिलेच्या अंत्यसंस्काराला कोणी येऊ नये यावरुन समाजातील माणुसकी दिसून आली.
कोरोनाच्या भीतीने ओशाळली माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 1:04 PM