जळगाव : ‘यास’ चक्रीवादळामुळे रविवारी आठ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यानंतर सोमवारी पुन्हा रेल्वे प्रशासनातर्फे पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस सहा सुपरफास्ट गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच दोन पार्सल गाड्याही रद्द केल्या आहेत.
तौक्ते वादळानंतर आता पुन्हा ‘यास’ चक्री वादळ आल्याने रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून गुजरात व ओडिसाकडे जाणाऱ्या गाड्या रद्द केल्यानंतर आता पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या तीन दिवस रद्द केल्या आहेत.
हे चक्रीवादळ गुजरात आणि ओडिसाच्या किनारपट्टीवरून आता पश्चिम बंगालकडे वळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या सहा गाड्या तीन दिवस रद्द केल्या आहेत. दरम्यान, या वादळाची तीव्रताही अधिक राहिली तर या गाड्या आणखी काही दिवस रद्द होण्याची शक्यता रेल्वेच्या सूत्रांनी वर्तवली आहे. रद्द केलेल्या या सर्व गाड्यांना जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असून, या वादळामुळे गुजरात, ओडिसा व पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
इन्फो :
चक्रीवादळामुळे रद्द केलेल्या गाड्या
चक्रीवादळामुळे रेल्वे प्रशासनातर्फे जळगावमार्गे पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन मिळून सहा गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये गाडी क्रमांक( ०२२७९) पुणे-हावडा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक(०२२८०) हावडा पुणे एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०२८३३) अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०२८३४) हावडा -अहमदाबाद एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०२८०९) मुंबई हावडा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक( ०२८१०) हावडा मुंबई एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०२५५९) मुंबई हावडा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ( ०२२६०) हावडा- मुंबई एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ( ०२९०५) ओखा- हावडा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०२९०६) हावडा-ओखा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक( ०२२५५) कामख्या विशेष एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.
इन्फो :
दोन पार्सल गाड्याही रद्द
या चक्रीवादळामुळे रेल्वे प्रशासनाने जळगावमार्गे मुंबई ते पश्चिम बंगालमधील शालिमार दरम्यान धावणारी पार्सल गाडी २७ मे पर्यँत रद्द ठेवली आहे. तसेच सांगोला ते शालिमार दरम्यान धावणारी पार्सल गाडीही रद्द केली आहे. अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे.