फाेटो नंबर : २० उदय चौधरी
फाेटो नंबर : २० मिनाक्षी चौधरी
फाेटो नंबर : २० विमल चौधरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे दररोज कुणाचा ना कुणाचा मृत्यू होत असतांना एकाच कुटुंबातील अनेकांचा बळी गेल्यामुळे कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. साने गुरूजी कॉलनीत राहणाऱ्या पती-पत्नीचा देखील एकाच आठवड्यात कोरोनाने बळी घेतला आहे. या धक्क्याने आईचा देखील मृत्यू झाल्यामुळे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
यावल तालुक्यातील अट्रावल येथील मूळचे रहिवासी उदय बळीराम चौधरी (७४) हे पत्नी मीनाक्षी (६७) व आई विमल चौधरी (९३) यांच्यासह साने गुरूजी कॉलनीत वास्तव्यास होते. उदय चौधरी हे शेती करतात. पंधरा दिवसांपूर्वी मीनाक्षी यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांनी लागलीच कोरोना चाचणी केली. तो अहवाल त्यांचा पॉझिटिव्ह आला. तीन ते चार दिवसांनी त्यांचे पती उदय चौधरी यांनीदेखील कोरोना चाचणी करून घेतली. त्यांचा अहवाल सुध्दा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पती-पत्नीवर रूग्णालयात उपचार सुरू होते.
पत्नीच्या मृत्यूच्या दुस-या दिवशी आईचाही मृत्यू
१५ मे रोजी सकाळी ६.१५ वाजता मीनाक्षी चौधरी यांचा कोरोनामुळे बळी गेला. हा धक्का सहन न झाल्यामुळे दुस-याच दिवशी उदय चौधरी यांच्या आई विमल चौधरी यांचा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. सासू-सूनेच्या लागोपाठ मृत्यूमुळे चौधरी कुटूंबावर मोठा आघात झाला.
बुधवारी उदय चौधरींची प्राणज्योत मालवली
दरम्यान, उदय चौधरी यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती सुधारली असताना, अचानक पुन्हा त्यांना त्रास होवू लागला. त्यातच बुधवार १९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगा अमोल चौधरी, दोन मुली, जावई असा परिवार आहे. ते हेमंत चौधरी व संजय चौधरी यांचे मोठे बंधू होत.
एकाच आठवड्यात एकाच घरातून निघाल्या तीन अंत्ययात्रा
एकाच आठवड्यात साने गुरुजी काॅलनीतील चाैधरी कुटुंबातील कर्ता व्यक्ती, त्यांची आई आणि पत्नी अशा तिघांचा मृत्यू झाल्याने तीन अंत्ययात्रा निघाल्या. काही दिवसांच्या अंतराने झालेल्या या आघातामुळे चौधरी कुटुंब पूर्णपणे कोलमडले आहे. उदय चौधरी यांच्या बुधवारी दुपारी २ वाजता नेरी नाका येथे अंत्यसंस्कार झाले.