लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याच्या खून प्रकरणाचा सोमवारी उलगडा झाला आहे. सुधाकर रामलाल पाटील (४०, चिंचखेडा,ता.जामनेर), देविदास नामदेव पाटील (४०), अरुणाबाई गजानन वारंगणे (३०) रा. कुसुंबा, ता. जळगाव या तिघांना अटक करण्यात आली आहे.
अरुणाबाई हिने आशाबाईकडून १२ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या पैशाचा तगादा व घरात आणखी काही ऐवज मिळेल या लालसेनेच हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आशाबाईच्या अंगावरील दागिनेही हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली होती तर गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले आदी उपस्थित होते.