जळगाव : दारू पिणे का सोडत नाही, असे बोलल्याचा राग आल्याने पतीने पत्नी विद्या सतीश सोनवणे हिच्या हातावर कुऱ्हाड मारून जखमी केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता तालुक्यातील भादली बुद्रूक येथे घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,विद्या सतीश सोनवणे या पतीसह धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथे राहतात. काही दिवसांपासून त्या माहेरी भादली बुद्रूक येथे वडिलांकडे राहत आहेत. ३ जून रोजी सायंकाळी विद्या यांचे पती सतीश अरुण सोनवणे हे भादली बुद्रूक येथे आले. घराबाहेरून त्यांनी विद्या यांना बोलावले. तसेच आता मी दारू पिणार नाही, म्हणून चोरगाव येथे माझ्या सोबत चल असे सांगितले. त्यावर विद्या यांनी पती सतीश यास तुम्ही नेहमीच असे सांगतात व दारू पिणे सोडत नाही असे म्हटले. याचा राग आल्याने सतीश याने पत्नी विद्या हिच्या डाव्या हातावर कुऱ्हाड मारली. यात त्या जखमी झाल्या. याप्रकरणी विद्या सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शुक्रवारी रात्री पती सतीश अरुण सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार शांताराम जगन्नाथ तळेले हे करीत आहेत.