मुख्य पान १ साठी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एका पाठोपाठ तीन मुली झाल्याच्या कारणावरून पत्नीचा खून करणाऱ्या पप्पू रतन पवार (वय ३१, विवेकानंद नगर तांडा, पाचोरा) या पतीला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमालानी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा निकाल दिला.
पाचोरा येथील पप्पू रतन पवार हा त्याची मृत पत्नी कस्तुराबाई (३०), मुलगी गौरी (७ वर्षे), भाग्यश्री (३.५ वर्षे) व खुशी (१.५ वर्षे) अशा तीन मुलींसह राहत होता. आरोपी पाचोरा येथेच एका हॉटेलवर कामाला होता. ९ जून २०१९ रोजी रात्री पप्पू याने तुला मुलीच होतात असे म्हणत मद्याच्या नशेत पत्नीशी भांडण केले. या भांडणात लाकडी दांडा पत्नीच्या डोक्यात टाकला. त्यात पत्नीचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, या घटनेबाबत कस्तुराबाईची आई पद्माबाई राठोड (६०, रा. आनंद नगर तांडा, ता. एरंडोल) यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून पप्पू पवार विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी एकूण दहा साक्षीदार तपासले. न्यायालयाने पप्पू पवार याला दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.