लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गुरूवारी रात्री उद्भवलेल्या बिकट परिस्थितीनंतर मध्यरात्री साडे पाच टन आणि शुक्रवारी दुपारी साडे पंधरा टन लिक्विड ऑक्सिजन टँकमध्येे भरण्यात आल्याने पुढील दोन दिवसांची चिंता मिटली आहे. हा दुसरा टँकर आल्याने दिलासा मिळाला आहे. गुरूवारी प्रशासनाची तारांबळ उडाली होती. मध्यरात्रीपर्यंत यंत्रणा टँकजवळ थांबून होती.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल रुग्णांना नियमित ८ मेट्रक टन लिक्विड ऑक्सिजनची गरज लागत आहे. गुरूवारी कठीण परिस्थिती उद्भवल्याने जुन्या पॅनलप्रमाणेच कक्षात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला होता. रुग्णालयाने आधीच हे नियोजन करून ठेवल्यामुळे हे संकट टळले होते. रात्री पाऊण वाजेच्या सुमारास टँकर आल्यानंतर यातून साडे पाच मेट्रिक टन लिक्विड भरण्यात आले होते. याने रात्रीची चिंता मिटली होती. त्यानंतर शुक्रवारी नियमित टँकर आले व त्यातून १५.५ टन लिक्विड हे ऑक्सिजन टँमध्ये भरण्यात आले आहे. दरम्यान, आता १६ टन साठा शिल्लक असून ते पुढील दोन दिवस चालणार आहे. तोपर्यंत पुन्हा एक टँकर येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
डॉ. पटेल यांचा सत्कार
गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजता ऑक्सिजन टँक संपल्यानंतर तातडीने ऑक्सिजन सिलिंडर द्वारे पुरवठा करून पूर्ण वेळ या वर नियंत्रण ठेवत ही परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळल्याने ऑक्सिजन समितीचे प्रमुख डॉ. संदीप पटेल यांचा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सत्कार केला.