जळगाव : ‘मै हू डॉन, अभी सबको दिखाता हू लिंबू राक्या क्या चिज है’, असे म्हणत हातातील गावठी बनावटीची पिस्तूल फिरवून बहिणाबाई उद्यानाजवळ दशहत माजवित असताना राकेश चंद्रकांत साळुंखे उर्फ लिंबू राक्या (२४,रा. कांचनगर, जळगाव) याला सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. असून त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आलीआहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शनीपेठ हद्दीतील राकेश साळुंखे उर्फ लिंबू राक्या हा सोमवारी रात्री ८ वाजता बहिणाबाई उद्यान परिसरात बेकायदेशीरित्या गावठी बनावटीची पिस्तूल घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाली होती. बापू रोहम यांनी विजय श्यामराव पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन यांचे पथक रवाना केले. पथकाने उद्यान परिसरात शोध घेतला असता, बहिणाबाई उद्यानाच्या प्रवेशाव्दारासमोर तो हातात पिस्तूल घेवून लोकांना ‘मै हू डॉन, अभी सबको दिखाता हू लिंबू राक्या क्या चिज है’, असे म्हणून दहशत माजवित होता. पथकाने त्याला त्यास ताब्यात घेतले. पोलीस कर्मचारी सचिन महाजन यांच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.